कर्जत : ‘कुकडी’ ओव्हरफ्लोतून आवर्तनाचे आदेश | पुढारी

कर्जत : ‘कुकडी’ ओव्हरफ्लोतून आवर्तनाचे आदेश

कर्जत(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : कर्जत-जामखेड मतदारसंघाला यंदा पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे जनतेला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. कमी पावसावर पेरणी केलेली खरीप पिके पावसाअभावी धोक्यात आली आहेत. या परिस्थितीत जनतेला दिलासा देण्यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची काल भेट घेऊन कुकडीचे आवर्तन सोडण्याची मागणी केली. पुण्याचे पालकमंत्री तथा कुकडी कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तातडीने या मागणीची दखल घेतल कुकडी डावा कालव्यातून ओव्हरफ्लोचे आवर्तन सोडण्याचे आदेश दिले आहेत.

कुकडी लाभक्षेत्रातील शिरूर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या ठिकाणी यावर्षी पाऊस कमी झाला आहे. जूलै उजाडला तरी या भागात अजूनही दमदार पाऊस नाही. पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने काही गावांमध्ये टँकर सुरू आहेत. पिण्याचा पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. पर्जन्यमान कमी झाल्याने तातडीने कुकडी डावा कालव्यातून ओव्हर फ्लोचे आवर्तन सोडण्याची आवश्यकता आहे. कुकडीचे ओव्हरफ्लोचे आवर्तन तातडीने सोडल्यास जनतेला दिलासा मिळणार आहे. ही बाब आमदार शिंदे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस व पुण्याचे पालकमंत्री पाटील यांच्या निदर्शनास आणून देत आवर्तन सोडण्याची निवेदनाद्वारे मागणी केली.

यावेळी आमदार शिंदे यांच्या समवेत आमदार सुरेश धस, कुकडी कालवा सल्लागार समितीचे सदस्य काकासाहेब धांडे, माजी जि. प. सदस्य अशोक खेडकर, नितिन पाटील, महेश तनपुरे, अनिल गदादे, प्रवीण फलके उपस्थित होते. निवेदनात म्हटले की, 27 जूलै रोजी 47 टक्के उपयुक्त पाणीसाठा कुकडी प्रकल्पात आहे. म्हणजे कुकडी प्रकल्पात दैनंदिन 5 द.ल.घ.फू. पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे 31 जुलैपूर्वी 30 टक्के पाणीसाठा झाला असेल, तर ओव्हरफ्लो आवर्तन सोडता येते, असा नियम व प्रघात आहे.

पाऊस कमी झाल्याने तातडीने ओव्हरफ्लो आवर्तन डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याची आवश्यकता आहे.तसेच येडगाव धरण ओव्हर फ्लोच्या मार्गावर आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न, खरीप पिकांसाठी ओव्हरफ्लो आवर्तन तातडीने सोडण्याचे आदेश देण्याची विनंती आमदार शिंदे यांनी निवेदनात केली होती.

दरम्यान, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार शिंदे यांच्या मागणीची दखल घेऊन कुकडी डावा कालव्यातून ओव्हरफ्लोचे आवर्तन सोडण्याचे आदेश कुकडीच्या मुख्य अभियंत्यांना दिले आहेत. हे आवर्तन आज संध्याकाळपर्यंत पाणी सुटणार आहे. त्यामुळे पाणी टंचाईचा सामना करीत असलेल्या शिरूर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या भागाला मोठा दिलासा मिळणार आहे.

आमदार शिंदे धावले मदतीला

यंदा कर्जत-जामखेड मतदारसंघात पावसाचे प्रमाण कमी असल्याने आमदार प्रा राम शिंदे हे पुन्हा एकदा शेतकर्‍यांच्या मदतीला धावून आले आहेत. कुकडीच्या डाव्या कालव्यातून ओव्हरफ्लो चे आवर्तन सोडण्यात येणार असल्याच्या निर्णयामुळे शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमच्या मागणीची दखल घेत कुकडीचे आवर्तन सोडण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे जनतेचा पिण्याचा पाणीप्रश्न मिटणार असून खरीप पिकांनाही जीवदान मिळणार आहे.

आमदार प्रा. राम शिंदे

हेही वाचा 

पुणे : पेन्शनच्या नादात गमाविले सात लाख

अहमदनगर : महापालिकेत मानधनावर नेमणार 17 अभियंते

रत्नागिरी : पुराचा फटका बसलेल्या चांदेराई गावाची मंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी

Back to top button