अहमदनगर : महापालिकेत मानधनावर नेमणार 17 अभियंते | पुढारी

अहमदनगर : महापालिकेत मानधनावर नेमणार 17 अभियंते

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या विविध विभागांत उपअभियंत्यांची अनेक पदे रिक्त आहेत. मानधनावर पदभरतीसाठी ऑक्टोबर 2022 मध्ये 287 मुलाखती घेण्यात आल्या. मात्र, अद्याप निवड समितीने त्यांना नियुक्ती दिलेली नाही. पुढील आठवड्यात संबंधितांना नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. महापालिकेत कर्मचार्‍यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. जुने कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. महापालिकेत बांधकाम, पाणीपुरवठा, नगररचना विभागात अगदी एक ते दोन कनिष्ठ अभियंत्यांवर कामकाजाचा कार्यभार आहे. त्यामुळे त्यांना काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

बांधकाम विभागामध्ये अवघे दोन कनिष्ठ अभियंता आहेत. तर, नगर शहरात जवळपास एक लाख 20 हजारांपर्यंतच्या मालमत्ता आहेत. कर्मचार्‍यांच्या कमतरतेमुळे कामकाजावर परिणाम होतो. त्यामुळे स्थायी सभेत मंजुरी घेऊन तत्पुरत्या स्वरूपात मानधनावर कनिष्ठ अभियंता नेमण्याचा निर्णय झाला. त्यानुसार जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. 17 ऑक्टोबर रोजी मनपामध्ये मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतीसाठी 541 अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील 287 उमेदवारांनी प्रत्यक्षात मुलाखती दिल्या.

मुलाखतीसाठी पुणे, औरंगाबाद, बीड, लातूर येथून उमेदवार आले होते. मुलाखती होऊन जवळपास दहा महिना झाले असून, अद्याप निवड यादी जाहीर झाली नाही. महापालिका पदाधिकार्‍यांनी आपल्या मर्जीतील व्यक्तीला मानधन तत्त्वावर नियुक्ती मिळावी, यासाठी अधिकार्‍यांकडे शिफारशी केल्या आहेत. त्यामुळे नेमकी नियुक्ती कोणाला द्यायची. गुणवत्तेवर नियुक्ती द्यायची की शिफारशीचा विचार करायचा, असा प्रश्न अधिकार्‍यांसमोर उपस्थित झाला होता, अशी चर्चा पालिका वर्तुळात होती. मात्र, अधिकार्‍यांनी गुणवत्तेच्या आधारावर नियुक्ती देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समजली.

दरम्यान, शासनस्तरावर पदभरतीसाठी मनपाने आकृतिबंद नगररचना विभागाला दिल्याने मानधनावरील पदभरती लांबली होती. मात्र, शासकीय स्तरावर पदभरतीला वेळ लागत असल्याने महापालिका अधिकार्‍यांनी मानधन तत्त्वावर पदभरतीला हिरवा कंदिल दाखविला. पुढील आठवड्यात सर्व प्रक्रिया पार पाडून मुलाखतीमधून निवड केलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली.

हेही वाचा

सांगली : कडेगावात आज गगनचुंबी ताबुतांच्या भेटी

सांगली : रिक्षावाला खड्डे मुजवू लागला अन् आली महानगरपालिकेला जाग

सांगली : कडेगावात आज गगनचुंबी ताबुतांच्या भेटी

Back to top button