आमदार लंके यांच्याकडून फसवणूक ; शब्द फिरविल्याचा चंद्रकांत चेडे, अशोक चेडे यांचा आरोप | पुढारी

आमदार लंके यांच्याकडून फसवणूक ; शब्द फिरविल्याचा चंद्रकांत चेडे, अशोक चेडे यांचा आरोप

पारनेर : पुढारी वृत्तसेवा :  नगरपंचायतीमध्ये माजी आमदार विजय औटी व विद्यमान आमदार नीलेश लंके यांनी आम्हाला फसविले आहे. निष्ठावंतांऐवजी नगराध्यक्षपदी घोटाळेबाज व तुमच्याशी दगाफटका करणारांना बसविणार का? असा सवाल माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे व नगरसेवक अशोक चेडे यांनी केला आहे. नगराध्यक्ष पदावरून शहरात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहर विकास आघाडीच्या वतीने चंद्रकांत चेडे व भाजपा नगरसेवक अशोक चेडे यांनी पारनेर येथे पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. मागील नगराध्यक्ष निवडीच्या वेळी शहर विकास आघाडीच्या नगरसेवकास सव्वा वर्षानंतर नगराध्यक्ष करण्याचा दिलेली शब्द आमदार लंके यांनी पाळला नाही.

पक्षाचे निष्ठावान नगरसेवक कावरे व नगरे यांना डावलण्यात आले आहे. नितीन अडसूळ यांच्यावर 102 कोटी रूपयांच्या टँकर घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल असून, जिल्हा न्यायालयाने अटी व शर्ती लागू करून त्यांना जामीन दिलेला आहे. याच अडसूळ यांना आमदार लंके नगराध्यक्ष करत असतील तर, आगामी काळात त्यांच्या विरोधात काम करणार असल्याचे चेडे यांनी स्पष्ट केले.
शेवटच्या क्षणी नगर येथे 9 नगरसेवकांना बोलावून, 2 जणांना न बोलविण्यामागे आमदार लंके यांची चाल असल्याचा आरोपही चंद्रकांत चेडे यांनी केला आहे. आमदार लंके यांना उच्च शिक्षित लोक चालत नसून, इयत्ता 5 वी, 7 वी वाले चालतात. नगराध्यक्ष पदाच्या निवडीत शहर विकास आघाडीचे उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणारे अर्जुन भालेकर व गटनोंदणीत सहयोगी सदस्य असणारे अशोक चेडे यांनाही अंधारात ठेवून गैरविश्वास दाखविण्यात आला.

ही आमच्यासाठी गंभीर बाब होती. जेथे गैरविश्वास निर्माण होतो, तेथे थांबणे योग्य नाही. विकासाच्या कामाला आम्ही नेहमी बरोबर आहोत. मात्र, वाईट गोष्टींना आम्ही विरोध करणार आहोत, असेही चंद्रकांत चेडे म्हणाले. आमदार लंके यांच्या विनंतीवरून नगरपंचायतीत सत्ता स्थापन झाली. सव्वा वर्षानंतर शहर विकास आघाडीला नगराध्यक्षपद देण्याचा शब्द त्यांनी दिला होता. सुपा येथील बैठकीत पुन्हा शब्द दिल्याप्रमाणे कागदपत्रे गोळा करण्यासाठी सांगितले. शुक्रवारी ठरल्याप्रमाणे 11 वाजता फोन लावला असता त्यांनी नगरला येण्याचा निरोप दिला. आमदार लंके यांनी दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप चंद्रकांत चेडे व नगरसेवक अशोक चेडे यांनी केला.

भालेकरांनी स्वाभिमान गहाण ठेवला
अर्जुन भालेकर हे शहर विकास आघाडीचे प्रमुख असून, त्यांनी आमच्यासह प्रभागातील 3 हजार मतदारांना फसविले आहे. स्वाभिमान गहाण ठेवून त्यांनी आमदार लंकेंबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. उपनगराध्यक्ष असूनही, त्यांना आपल्या प्रभागात विकासकामाचा नारळ फोडता आला नाही, अशी टीका चेडे यांनी केली.

हे ही वाचा : 

शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवास मंगलमय वातावरणात सुरवात

नगर : तिसगावातील अतिक्रमणप्रकरणी ग्रामसेवकाला जामीनपात्र वॉरंट

Back to top button