नगर : तिसगावातील अतिक्रमणप्रकरणी ग्रामसेवकाला जामीनपात्र वॉरंट

करंजी : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील अतिक्रमण प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाकडूने तिसगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. तसेच, पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही खंडपीठाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले आहेत.
तिसगाव येथील गट नंबर 296 मधील गायरान जमिनीसह कोष्टी समाजाच्या स्मशानभूमीवर केलेले अतिक्रमण, तसेच बाजार तळाजवळील ऐतिहासिक वेशीजवळील अतिक्रमणाविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणात ग्रामपंचायतीच्या गट नंबर 296 मधील गायरान जमिनीमध्ये केलेल्या अतिक्रमणांसह ग्रामपंचायतीने 11 महिने करारावर दिलेले गाळे, कोष्टी समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेवर काही लोकांनी अतिक्रमण करून केलेले पक्के बांधकाम त्वरित हटवावे, तसेच बाजारतळ परिसरामधील ऐतिहासिक वेशीजवळ पक्के बांधकाम करून अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यासह गावाजवळून वाहणार्या ओढ्यावर केलेल्या अतिक्रमणांसह सर्व अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक गारूडकर यांनी याचिकेत केलेली आहे.
औरंगाबाद खंडपीठात या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. प्रशासकीय अधिकारी सुनावणीस उपस्थित न राहिल्याने खंडपीठाने ग्रामसेवकास 15 हजार रूपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकार्यांना नोटिसा बजावल्या असून, या संदर्भात पुढील सुनावणी आता 13 जुलै रोजी होणार आहे. शासनाकडून सरकारी वकील एस. जी. कार्लेकर, तर याचिकाकर्ते गारूडकर यांच्या वतीने अॅड. हेमंतकुमार पवार काम पाहत आहेत.
हे ही वाचा :
भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष होणार राज्यसभा खासदार! सदानंद शेट तानावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब