नगर : बिंगोचे बिंग फुटेना अन् …! | पुढारी

नगर : बिंगोचे बिंग फुटेना अन् ...!

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील प्रवरासंगममधील बिंगो व पत्यांचा जुगाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रवरासंगम पोलिसांच्या दुर्लक्षामुळे बिंगो व पत्यांचा जुगारापायी अनेकांचे संसार उघड्यावर आले. पोलिसांना प्रवरासंगममधील ‘बिंगोचे बिंग फुटेना अन् जुगाराला आळा बसेना, अशी गत झाल्याचे दिसत आहे. तालुक्यात प्रवरासंगम मराठवाड्याचे प्रवेशद्वार आहे. या परिसरात मराठवाड्यातील अनेक गुन्हेगारांचा वावर असतो. पोलिसांच्या विविध गुन्ह्यातील तपासामधून दिसून आले आहे.

पत्यांचे जुगार अड्डे व बिंगोचा जुगार दिवसेंदिवस प्रवरासंगममध्ये वाढत आहेत. नेवासा पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या प्रवरासंगम दुरक्षेत्रावर या परिसरातील गावांची जबाबदारी दिलेली आहे. येथील पोलिसांना आपल्या जबाबदारीचा विसर पडल्याने बिंगो व जुगार अड्ड्यांची मक्तेदारी वाढली. तरुण पिढी बिंगोच्या नादी लागली. घरातून पाकीटमनी पालकांकडून घेतल्यानंतर तरुण बिंगोकडे वळतात. या जुगारामध्ये हरल्यानंतर ही व्यसनाधिनतेकडे वाटचाल करतात. बिंगोबरोबर पत्यांच्या क्लबमध्ये स्थानिकांबरोबर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, वैजापूर आदी भागातील खेळींचा सहभाग असल्याचे सांगितले जाते.

वरिष्ठांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज
लाखोंची उलाढाल होत असल्याची चर्चा आहे. अवैध दारू विक्रीचा व्यवसायाने घराघरांत भांडणे वाढली आहेत. बिंगोचे बिंग फुटेना अन् जुगाराला आळा बसेना अशी गत प्रवरासंगममध्ये आहे. बिंगो व जुगारामुळे अवैध दारुविक्रीने प्रवरासंगममधील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्यापूर्वी वरिष्ठांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

 

Back to top button