नगर : रस्त्यावरील दुभाजकामुळे वाढले अपघात | पुढारी

नगर : रस्त्यावरील दुभाजकामुळे वाढले अपघात

संदीप वाखुरे

नेवासा फाटा : नगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नेवासा फाटा येथील रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकावर कोणत्याही प्रकारचे रेडिअम किंवा दिशादर्शक फलक नसल्याने येथे अपघातांची मालिका सुरू आहे. त्यामुळे फाट्यावरील हा दुभाजक धोकादायक बनल्याचे दिसत आहे. नेवासा फाटा हा अहमदनगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील तर आहेच पण नेवासा तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. या रस्त्यावरून नागपूर तर इकडं मुंबई पर्यंत जाता येते. अनेक प्रकारची जड वाहने तसेच महागड्या कार तसेच मंत्री यांची वाहने या रस्त्यावरून धावत असतात. नेवासा फाटा सुरू झालं की वाहन चालकाला वाहन कसे चालवावे अशी पंचायत होते. सतत गर्दी असल्यामुळे वाहन चालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागते.

नेवासा फाटा येथे रस्त्यावरील दुभाजकावर कोणत्याही प्रकारचे रिफ्लेक्टर तसेच विविध प्रकारचे सिग्नल नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी दररोज एक तरी कार तसेच जड वाहने दुभाजकावर जातात. त्यामुळे वाहनांचे खूप नुकसान होते. दुभाजकावर कोणत्याही प्रकारचा पिवळा, काळा या रंगाचा पट्टा लावलेला नसल्याने सायंकाळी हमखास एक तरी वाहन दुभाजकावर जाते.

याबाबत वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबधित इन्फ्रास्ट्रक्चर यांच्याशी संपर्क केला असता बघू, करू…, असे म्हणून आपली कामाची बिले काढून विषय मागे टाकून देतात. आजपर्यंत शंभराहून वाहनांची नुकसान दुभाजकामुळे झालेली आहे. कित्येक वाहनांची नुकसान झाल्याने रात्रभर नेवासा फाट्यावर मुक्काम करावा लागतो. नेवासा फाट्यावर चोवीस तास वाहनांची वर्दळ असते. दुभाजाकावर वाहने गेल्याने डिस्क वाकणे तसेच टायर फुटण्याचे प्रकार घडले आहे.

दुभाजकाची एक तर उंची वाढवणे गरजेचे आहे. अहिल्याबाई होळकर चौक ते राजमुद्रा चौक या दरम्यान असलेला हे दुभाजाक काढण्याची मागणी वाहन धारक करत आहे. निकृष्ट दर्जाचे दुभाजाक बनवलेले आहे. पावसाळ्यात तर प्रत्येक चौकातील व्यापारी तसेच तरुणांना दुभाजाकावरील वाहने काढण्याचे काम करावे लागते. रस्ता हा डॉ. आंबेडकर चौक तसेच राजमुद्रा चौकामध्ये दोन ठिकाणी रस्ता तुटलेला आहे. रस्ता कट झाला असल्यामुळे वाहनधारकांना वाटते पुढे रस्ता नाही त्यामुळे वाहने वेगात असतात अचानक पुन्हा रस्ता सुरू झालेला दिसतो पण वाहन नियंत्रण राहत नाही, परिणामी वाहन दुभाजकावर जाते. दुभाजकाबाबत संबंधित अधिकारी मात्र निवांत आहेत. दुभाजकावर रिफ्लेक्टर किंवा सौर उर्जेवर चालणारे सिग्नल बसवावे, किंवा त्वरित दुभाजक गावापूरते तरी काढावे, अशी मागणी नागरिक तसेच व्यापार्‍यांकडून होत आहे.

एकच खड्डा 13 वेळेस बुजविल्याचा प्रताप

रस्ता दुभाजाकाबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, ठेकेदार मात्र सोयीस्करपणे काना डोळा करत आहे. बांधकाम अधिकारी यांना काही देने घेणे राहिलेले नाही किव्हा गांभीर्य दिसत नाही. बांधकाम खात्याने तर राजमुद्रा चौकातील एकच खड्डा तब्बल तेरा वेळेस बुजविला आणि बिले काढली असा प्रताप बांधकाम खात्याचा आहे. थातूर मातूर रस्त्यावरील खड्डे बुजविले जातात. पावसाळा आल्याने आता तरी रस्ता दुभाजाकाकडे लक्ष द्यावे अन्यथा लवकरच नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.

Back to top button