शिर्डी येथे 28 मे रोजी रिपाइंचे अधिवेशन; उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार | पुढारी

शिर्डी येथे 28 मे रोजी रिपाइंचे अधिवेशन; उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार

आश्वी(अहमदनगर);पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस हे येत्या दि.28 मे 2023 रोजी शिर्डी येथे होणार्‍या रिपब्लिकन पक्षाच्या राज्य अधिवेशनास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन निमत्रंण दिले. या अधिवेशनास येण्याचे फडणवीस यांनीही निमंत्रण स्वीकारले असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली.

यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या समवेत माजीमंत्री अविनाश महातेकर, सुनील मोरे, परशुराम वाडेकर, गौतम सोनवणे आदीसह कार्यकर्त्यानी राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या पुर्वी 3 ऑक्टोबर 2017 ला रिपब्लिकन हिरक महोत्सवी निमित्ताने रिपब्लिकन पक्षाचे महाअधिवेशन शिर्डीमध्ये झाले होते. त्यावेळी तत्कालीन महसूल मंत्री चद्रकांत पाटील, प्रा. राम शिंदे, महादेव जाणकर, सदाभाऊ खोते हे मंत्री उपस्थित होते. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यानी मोठी मेहनत करून अधिवेशन यशस्वी केले होते.

27 मे 2023 ला पुन्हा रिपब्लिकन पक्षाचे महाअधिवेशन होत असल्याने याकडे लोकांचा कल वेगळा दिसत आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे शिर्डी, अहमदनगर जिल्ह्याशी विशेष ऋणानुबंध असल्याने सर्व नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज करिष्मा चमकत असून 2024 ला पुन्हा मोदीच असणार ही मात्र काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळेच 2024 ची लोकसभा डोळ्यासमोर ठेवत शिर्डीतून पुन्हा एकदा रामदास आठवले यांची चाचपणी चालू आहे.

यामधून शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर, अकोले, नगरमध्ये सातत्याने रामदास आठवले यांचे दौरे होताना दिसत आहेत. छोट्या – मोठ्या कार्यक्रमला हजेरी लावत आहेत. महिन्यापूर्वी तर पक्षाची राज्यकार्यकारिणीची बैठकच शिर्डीत घेऊन कार्यकर्त्यांसह पत्रकारांशीही मन मोकळ्यापणाने गप्पा मारत मी शिर्डीतून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे जाहीर केले. मात्र भाजपाचे केंद्रीय नेतृत्वासह फडणवीस – विखे यांची सहमती असणे गरजेचे आहे. 27 मे 2023 रोजी होणार्‍या रिपब्लिकन पक्षाच्या महा अधिवेशनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निमंत्रीत करण्यात आले आहे.

Back to top button