नगर : पथदिव्याच्या एका खांबासाठी दोन खड्डे ! पक्का रस्ता खोदला | पुढारी

नगर : पथदिव्याच्या एका खांबासाठी दोन खड्डे ! पक्का रस्ता खोदला

नगर : पुढारी वृत्तसेवा :  सावेडी उपनगरातील महत्त्वाच्या कुष्ठधाम रस्त्यासाठी मनपाने तीन कोटी 35 लाख रुपये खर्च करून दर्जेदार रस्ता केला. त्या रस्त्यावर पथदिवे बसविण्यासाठी मनपाने पथदिव्याच्या कामाचा प्रस्ताव केला. रूंदी कमी असलेल्या रस्त्यावर पथदिव्यासाठी मधोमध खड्डे खोदले. त्यात रस्त्याचे सेंटर चुकल्याने एका खांबासाठी दोनदा खड्डे खोदले. त्यामुळे नव्याने केलेला रस्ता खराब झाला आहे. महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून कुष्ठधाम रस्ता केला. याच रस्त्यावर नगर तहसील कार्यालय, टीव्ही सेंटर, प्रोफेसर कॉलनी चौक अशी महत्त्वाचे ठिकाणे आहेत.

तर, सावेडी उपनगरासाठी रहदारीचा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. त्या रस्त्याचा अनेक दिवसांपासून प्रश्न प्रलंबित होता. आमदार संग्राम जगताप यांनी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला. त्यामुळे कुष्ठधाम रस्त्याचे काम दर्जेदार झाले. आता त्या रस्त्यावरील अंधार दूर करण्यासाठी मनपाने पथदिवे बसविण्याचा निर्णय घेतला. तोफखाना पोलिस ठाणे ते प्रोफेसर कॉलनी चौक रस्त्याची रुंदी कमी आहे. त्यात तिथे रस्त्याच्या मधोमध पथदिवे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. चार दिवसांपूर्वी संबंधित ठेकेदाराने पथदिव्याचे खांब बसविण्यासाठी खड्डे खोदले. मात्र, त्यातील काही खड्डे रस्त्याच्या सेंटरवर नसल्याने ते एका बाजूला गेले. परिणामी संबंधित ठेकेदाराने पुन्हा पहिल्या खड्ड्याच शेजारीच दुसरा खड्डा खोदला अन् रस्ता खिळखिळा करून टाकला. ठेकेदार व मनपा अधिकार्‍यांच्या चुकीमुळे चांगल्या रस्त्याचे वाट लागल्याची चर्चा नगरकरामध्ये आहे.

सिमेंट टाकून खड्डे बुजविले
कुष्ठधाम रस्ता पक्का डांबरी रस्ता आहे. पथदिव्यासाठी दोन खड्डे खोदल्याने एक खड्डा संबंधित ठेकेदाराने सिमेंट कॉक्रिटकरून बुजवून टाकल्याचे दिसून येते. आता तो रस्ता किती दिवस टिकरणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

ठेकेदाराची दबक्या आवाजात चर्चा

पथदिव्याचे खांब बसविण्याचा ठेका महापालिकेतील एका पदाधिकार्‍याच्या नातलगाचा आहे. त्यामुळे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी तोंडावर बोट अन् हाताची घडली घातली आहे. परंतु, नागरिकांमध्ये त्या ठेकेदाराच्या नावाची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

Back to top button