पराभुतांची युती अशीच राहावी : माजी आमदार राहुल जगताप | पुढारी

पराभुतांची युती अशीच राहावी : माजी आमदार राहुल जगताप

श्रीगोंदा (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत एकत्र आलेल्या पाचपुते-नागवडे यांच्या युतीला मतदारांनी पराभवाची धूळ चारली. आगामी जिल्हा परिषद-पंचायत समिती आणि विधानसभा निवडणुकीतही दोघे एकत्र राहिले तर आनंदच होईल, असा टोला माजी आमदार राहुल जगताप यांनी मारला. त्यांची युती अशीच कायम रहावी. बाजार समिती निवडणुकीतील विजयी उमेदवार व महिला महाराष्ट्र केसरीचा पहिला किताब जिंकणार्‍या भाग्यश्री फंड हिचा सन्मान करण्यात आला. भाग्यश्रीला 51 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. त्या वेळी राहुल जगताप बोलत होते.

जगताप म्हणाले, की या बड्या शक्तींच्या विरोधात लहान-लहान माणसे एकत्र आली. आपला पाडाव करण्यासाठी अनेकांनी विडा उचलला होता; मात्र जेव्हा मतदार निवडणूक हातात घेतात तेव्हा इतिहास घडतो आणि हा इतिहास बाजार समिती निवडणुकीत घडला. 18-0 च्या गप्पा मारणार्‍यांना मतदारांनी जोरदार चपराक दिली आहे. आगामी निवडणुकीतही त्यांची युती अशीच कायम राहावी.
राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा म्हणाले, की माझा मुलगा मितेशचा पराभव दिसत होता; पण राहुल जगताप यांच्यासाठी शहीद होण्याची तयारी ठेवली. हा चक्रव्यूह भेदण्यात आपल्याला अपयश आले. मुलाच्या पराभवापेक्षा पार्टीचा विजय महत्त्वाचा आहे, हे सांगताना नाहाटा यांना रडू कोसळले.

दीपक भोसले म्हणाले, की तालुक्याचे राजकारण पाचपुते नागवडेंनी पैशाचा वापर करून गढूळ केले आहे. आता जिवाला जीव देणार्‍या राहुल जगताप यांच्यासारखा नेता विधानसभेत पाठवावा लागणार आहे. नागवडे साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशव मगर यांनीही पाचपुते-नागवडे एकत्र आल्याबाबत टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के म्हणाले, की बाजार समितीची निवडणूक विधानसभेची सेमीफायनल होती आणि ती आपण जिंकली. या वेळी माणिकराव पाचपुते, शरद जमदाडे, साजन पाचपुते, अतुल लोखंडे, भास्कर वागसकर, आप्पासाहेब जगताप, जितेंद्र मगर, संदीप रोडे उपस्थित होते.

Back to top button