डिझेल बस धावतेय इलेक्ट्रिकवर; प्रदूषण रोखण्यास हातभार

डिझेल बस धावतेय इलेक्ट्रिकवर; प्रदूषण रोखण्यास हातभार
Published on
Updated on

[author title="प्रसाद जगताप" image="http://"][/author]

पुणे : पीएमपी प्रशासनाने ताफ्यातील डिझेल बसचे रूपांतर आता इलेक्ट्रिक बसमध्ये केले असून, या बसची रूपांतरणाची प्रक्रिया आणि प्रवासी वाहतुकीची चाचणी नुकतीच यशस्वी झाली. या प्रक्रियेमुळे पीएमपीच्या इंधनखर्चात बचत होणार असून, प्रदूषण रोखण्यास मोठा हातभार लागणार आहे. पीएमपीच्या ताफ्यात 1948 बसगाड्या आहेत. त्यापैकी 1500 ते 1600 बसगाड्या दररोज मार्गावर धावतात. त्याद्वारे दररोज सुमारे 10 ते 12 लाख प्रवासी प्रवास करतात.

यापूर्वी पीएमपी प्रशासनाने केंद्राच्या फेम 2 या योजनेअंतर्गत सुमारे 400 ते 500 च्या घरात ई-बस मिळवल्या आहेत. याव्यतिरिक्त पीएमपी प्रशासनाने ताफ्यातील डिझेल इंधनावर धावणार्‍या बसचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. नुकताच हा उपक्रम यशस्वी झाला आहे. या उपक्रमाअंतर्गत तयार केलेली बस सध्या कोथरूड ते पुणे स्टेशन या मार्गावर यशस्वीरीत्या प्रवासी सेवा पुरवत आहे. यामुळे पीएमपीच्या अधिकारीवर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

असा आहे उपक्रम

पीएमपीची वाहतूक पर्यावरणपूरक करणे, इंधनखर्च बचत करणे, याकरिता पीएमपी प्रशासनाकडून हा उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे. यात पीएमपीने त्याकरिता आवश्यक असलेले रूपांतरणाचे काम 'मेधा इंजिनिअरिंग प्रा. लि.' या कंपनीला दिले आहे. या कंपनीने रूपांतरित केलेल्या बसची गेली दोन महिन्यांपासून चाचणी सुरू होती. ती आता यशस्वी झाली असून, या प्रायोगिक तत्त्वावरील बसद्वारे प्रवासी वाहतूक व्यवस्थितरीत्या सुरू आहे.

पीएमपीची अशी झाली बचत

पीएमपी ताफ्यातील बसगाड्यांच्या दिवसाला दररोज शहरातील 20 हजार 112 फेर्‍या नियोजित असतात. त्यापैकी सुमारे 18 हजार 682 फेर्‍या होतात. त्या फेर्‍या पूर्ण करण्यासाठी पीएमपीला हजारो रुपयांच्या सीएनजी आणि डिझेलची आवश्यकता लागते. तसे पाहिले तर प्रतिकिलोमीटरसाठी पीएमपीला 25 रुपयांपर्यंत इंधनाचा खर्च करावा लागतो. परंतु, आता या रूपांतर केलेल्या ई-बसला प्रतिकिलोमीटरसाठी फक्त 10 रुपये इतका खर्च येत आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी बसगाड्यांचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरण केल्यावर पीएमपीची बचत होणार आहे.

  • रूपांतरित ई-बस धावतेय कोथरूड ते पुणे स्टेशन मार्गावर
  • पीएमपीच्या इंधनखर्चात होणार बचत
  • उपक्रम यशस्वी

डिझेल बसचे 'ई'मध्ये रूपांतरण यशस्वी झाले आहे. खासगी कंपनीकडून आम्ही हे केले. त्यानंतर याकरिता आवश्यक असलेली प्रमाणपत्रे सीआयआरटी, एआरएआय, आरटीओकडून मिळवली आहेत. तसेच, आरटीओकडे इलेक्ट्रिक गाडीची नोंद करून, ट्रेड सर्टिफिकेट देखील मिळवले आहे. सध्या ही बस कोथरूड डेपोअंतर्गत सेवा पुरवत आहे. अशाप्रकारे आणखी काही बसचे रूपांतरण करण्याचे नियोजन आहे.

– रमेश चव्हाण, मुख्य अभियंता, पीएमपीएमएल

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news