श्रीगोंदा : दोन दादा अन् साहेबांना धोबीपछाड देत, राहुलदादाच पडले सगळ्यांना लईभारी ! | पुढारी

श्रीगोंदा : दोन दादा अन् साहेबांना धोबीपछाड देत, राहुलदादाच पडले सगळ्यांना लईभारी !

अमोल गव्हाणे

श्रीगोंदा : माजी आ. राहुल जगताप यांच्या यशाचा वारू रोखण्यासाठी बाजार समिती निवडणुकीत अनेक वर्षे श्रीगोंद्यावर राज करणारे माजी मंत्री आ.बबनदादा पाचपुते व राजेंद्रदादा नागवडे आणि बाबासाहेब भोस अशी तिघांची मोट बांधूनही पदरी अपयशच आले. दोन दादा अन् साहेबांना धोबीपछाड देत राहुल जगताप यांनी बाजार समितीवर निर्विवाद वर्चस्व मिळविले. भाजप-काँग्रेस एकत्र येवूनही जगताप यांनी मिळवलेले यश आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने टॉनिक ठरणार आहे.

खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकी दरम्यान अंतर्गत कुरघोडी झाल्याने नागवडे व जगताप एकमेकांपासून दुरावले. त्याच दरम्यान ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस समर्थक उमेदवार पराभूत झाल्याने भोस प्रचंड नाराज झाले होते. त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भोस यांनी नागवडे-पाचपुते यांचे मनोमिलन घडवित जगताप यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. चाळीस वर्षापासून एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले नागवडे-पाचपुते एकत्र आल्याने मतदारामध्ये वेगळा राजकीय संदेश गेला.

त्याचाच फटका बसल्याचे निकालातून स्पष्ट झाले. माजी आमदार राहुल जगताप यांनी सावध पवित्रा घेत निवडणुकी दरम्यान आश्वासक पाऊले टाकली. तालुक्यातील प्रत्येक गटातील कार्येकर्ते, मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क करून भूमिका स्पष्ट केली. समर्थक मतदारांशी संपर्क ठेवतानाच विरोधकांच्या निर्णय, भूमिकेवर बारकाईने लक्ष देऊन स्वयंत्रणा सतत कार्यरत ठेवली. त्याचाच सकारात्मक परिणाम निकालात दिसून आला. राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा, अण्णासाहेब शेलार, काष्टीचे सरपंच साजन पाचपुते यांनी राहुल जगताप यांना भरभक्कम साथ दिल्यानेच जगताप सत्ता काबीज करण्यात यशस्वी झाले.

राहुल जगताप यांनी तालुक्यात स्वतःची यंत्रणा उभी करत विस्तारली. तालुक्याच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन दोन वर्षांपासून ‘एकला चलो’ची भूमिका घेतली. सुरुवातीला जगताप यांच्या या भुमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, मात्र तरीही ते ठाम राहिले. गावोगावच्या ग्रामपंचायत, सेवा संस्था निवडणुकीत स्वतःची स्वतंत्र यंत्रणा उभी करत जगताप यांनी अल्पावधीत कार्यकर्त्यांचे मोठे जाळे विणले.

खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत सत्ता राखण्यात यश आल्याने बाजार समितीची निवडणूक स्वतंत्र लढवायची असा निर्णय त्यांनी त्याचवेळी घेतला होता. मात्र मोजक्या समर्थक कार्यकर्त्यांनी नागवडे यांच्याशी आघाडीची गळ घातली. मात्र त्यांना समजावत राहुल जगताप यांनी दोन बड्या शक्तीच्या विरोधात बाजार समिती निवडणूक लढविली अन् जिंकूनही दाखविली.

श्रीगोंदा तालुक्यात नागवडे-पाचपुते सोडून तिसरी राजकीय शक्ती उदयास येऊ शकत नाही असे चित्र एकेकाळी असायचे. आज मात्र राहुल जगताप यांनी स्वतःचे राजकीय अधिष्ठान भक्कम करत त्याला छेद दिला आहे. मितेश नाहटा यांचा पराभव जगताप गटाच्या जिव्हारी लागला. गड आला पण सिंह गेला अशी अवस्था झाल्याने राहुल जगताप यांनी विजयोत्सव साजरा केला नाही. बाजार समितीचा हा निकाल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांत जगताप समर्थकांना ऊर्जा देणारा ठरेल यात शंका नाही.

मितेश नाहटा टार्गेट

बाळासाहेब नाहटा यांचे सुपुत्र मितेश नाहटा यांनी बाजार समिती निवडणूक लढवली खरी मात्र निवडणूक काळात त्यांना पराभूत करण्यासाठी नागवडे-पाचपुते गटाने विशेष कष्ट घेतल्याचे दिसून आले. नाहटा यांचा पराभव धक्कादायक असला तरी त्यांना टार्गेट करूनच त्यांचा पाडाव केला हे मात्र तितकेच खरे.

विधानसभेची तयारी

माजी आमदार राहुल जगताप यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली असून खरेदी-विक्री संघ अन् आता बाजार समिती निवडणूक त्यांनी योग्य रीतीने हाताळत वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. एक-एक निवडणूक शिस्तबद्धरित्या हाताळत त्यांनी विधानसभेची पायाभरणी सुरू केली आहे.

प्रवीण लोखंडे यांची बाजी

युवा नेते प्रवीण लोखंडे हे राहुल जगताप यांच्या यंत्रणेतील एक प्रमुख कार्येकर्ते मानले जातात. लोखंडे यांच्या पराभवासाठी मोठी यंत्रणा राबली. मात्र लोखंडे यांचे काम अन त्यांनी योग्य रीतीने हाताळलेली निवडणूक त्यांना विजयापर्यत घेऊन गेली.

Back to top button