पाथर्डीच्या तरुणाला 38 हजार रुपयांना गंडा | पुढारी

पाथर्डीच्या तरुणाला 38 हजार रुपयांना गंडा

पाथर्डी तालुका(नगर); पुढारी वृत्तसेवा : ऑनलाइन शेअर मार्केटमधून जास्त नफ्याचे आमिष दाखवून उच्च शिक्षण घेणार्‍या एका युवकाची 38 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. विजय पांडुरंग ढाकणे (वय 25, रा. चुंभळी ता. पाथर्डी) असे या तरुणाचे नाव आहे. विजयने शेअर मार्केटमध्ये कॉईन विकत घेण्यासाठीची जाहिरात मोबाईलमध्ये पाहिली होती.

त्यामध्ये शंभर टक्के नफ्याचे आमिष दाखविले होते. या आमिषाला भुलून विजयने दि. 23 एप्रिल रोजी आपल्या बँक खात्यातून सजल शर्मा याच्या बँक खात्यावर ऑनलाईन 38 हजार रुपये दोन टप्प्यांत पाठविले. मात्र कंपनीने सांगितल्याप्रमाणे विजयला कोणतेही कॉइन मिळाले नाही. त्या सजल शर्मा या अंकाउंटधारक व्यक्तीने फसवणूक केल्याची फिर्याद विजय ढाकणे यांना दिली. त्यावरून पाथर्डी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या पैसे कमावण्याच्या ऑनलाईन वेगवेगळ्या पद्धतीच्या जाहिराती दाखवून पैसे उकळून फसवणूक होण्याच्या घटना पाथर्डी तालुक्यात गेल्या महिनाभरात अनेकदा घडल्या आहेत. काहींनी तक्रारी दिल्या, काहींनी तक्रारी दिल्या नाहीत. त्यामुळे स्मार्टफोन हाताळणार्‍या व्यक्तींनी अशा फसवेगिरीच्या जाहिरातींपासून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Back to top button