‘सिन्नर’च्या ठेकेदारावर प्रशासनाची मेहरनजर ? | पुढारी

‘सिन्नर’च्या ठेकेदारावर प्रशासनाची मेहरनजर ?

नगर; पुढारी वृत्तसेवा : नगरमध्ये जलजीवन योजनेचे काम मिळाले असतानाही, ते ऐनवेळी नाकारल्याने शासनाचे नुकसान झाले. त्यामुळे सिन्नरच्या त्या ठेकेदाराची बयाणा रक्कमही जप्त करण्यात आली. मात्र ती रक्कम अजुनही शासन तिजोरीत जमा दिसत नसतानाच, संबंधित ठेकेदाराला जिल्हा परिषदेतून पुन्हा दुसरे काम दिले गेले आहे. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी इंजि. सतिश वराळे व इंजि. संजय शिंदे यांनी केली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना पाठविलेल्या पत्रात वराळे म्हणाले की, सिन्न्नरच्या ठेकेदाराने श्रीरामपूर तालुक्यातील जलजीवनच्या योेजनेसाठी निविदा भरली. यात त्यांना ते काम मिळाले. मात्र संबंधित ठेकेदाराने कार्यारंभ आदेश घेतला नाही. त्यांनी योजनेचे काम करण्यास नकार दिला. त्यामुळे त्या ठेकेदाराची बयाणा एक लाखांची रक्कम जप्त करण्याच्या सूचना केल्या. मात्र ती रक्क्कम अजुनही शासन तिजोरीत जमा झालेली नाही.

अशा प्रकारे कारवाई असतानाही सध्याचे कार्यकारी अभियंता यांनी ‘त्याच’ ठेकेदाराला दुसरे काम देऊ केले आहे. वास्तविकतः अगोदरचे काम नाकारल्याने त्या कामाची पुन्हा निविदा काढावी लागली आणि त्यात 30 लाखांचा अधिकचा भुर्दंड शासनाच्या तिजोरीवर पडला. यासाठी संबंधित ठेकेदारच जबाबदार आहे. त्याच्यावर बयाणा रक्कम जप्तीची कारवाईही केलेली आहे. असे असताना त्याच ठेकेदाराला पुन्हा दुसरे काम कसे दिले, असा सवाल केला आहे.

‘ऑन दि स्पॉट’ सत्य बाहेर येईल
जलजीवन योजनेची सुरू झालेली कामे, प्राधान्याने करावयाची कामे, प्रत्यक्षात ठेकेदारांनी सुरू केलेली कामे, जि. प. प्रशासनाने त्यांना अदा केलेले देयके, याबाबत ‘माध्यमांनी ऑन दि स्पॉट’ पाहणी केल्यास सत्य जनतेसमोर येईल, असेही इंजि.वराळे यांनी पुढारीशी बोलताना सांगितले.

Back to top button