संगमनेर : बोटा येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार | पुढारी

संगमनेर : बोटा येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील बोटा (वडदरा) येथील उत्तम बाळाजी कुऱ्हाडे (वय ६२) या व्यक्तीवर घरात घुसून बिबट्याने हल्ला केला. शनिवारी (दि. २२) रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास घडलेल्या घटनेत कुऱ्हाडे यांचा जागीच मृत्यू झाला.

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा गावानजीक असणाऱ्या बोटा-अकलापूर रोडवरील वडदरा येथे वास्तव्यास असलेले उत्तम कुऱ्हाडे घरात टीव्ही पाहत होते. घराचा दरवाजा उघडा असल्यामुळे परिसरातच दबा धरून बसलेला बिबट्या काही कळायच्या आतमध्ये कु-हाडे यांच्या घरात घुसून बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवीत त्यांच्या नरडीचा घोट घेत त्यांना जागीच ठार केले.

कुऱ्हाडे यांच्या आईने हे दृश्य पाहताच क्षणी त्यांनी जोरात आरडाओरडा केला असता त्या बिबट्याने कुऱ्हाडे यांचा मृतदेह टाकून देत बिबट्याने पळ काढला. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनरक्षक डी.बी.कोरडे, एस.पी.सातपुते, वनसेवक बाळासाहेब वैराळ, आनंथा काळे हे सर्वजण घटनास्थळी दाखल झाले. यावेळी कुऱ्हाडे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. बिबट्याच्या हल्ल्याने बोटा अकलापूर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वारंवार बिबट्याचे हल्ले होत असल्यामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला असून रात्रीची शेतीची कामे कसे करायचे हाप्रश्न उभा राहिला आहे. बिबट्याचा वावर पूर्वी पेक्षा आता जास्त प्रमाणात वाढला आहे. बिबटे माणसांवरही हल्ले करु लागले असल्याने वनविभागाने गावोगावी पिंजरे लावावेत अशी मागणी संगमनेर पठारभाग युवक काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब कुऱ्हाडे यांसह ग्रामस्थांनी केली आहे.

Back to top button