नगर शहरातील ओढे-नाले खुले करण्याचे आयुक्तांचे आदेश | पुढारी

नगर शहरातील ओढे-नाले खुले करण्याचे आयुक्तांचे आदेश

नगर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील ओढ्या-नाल्यांवर अतिक्रमण झाले असून, बहुतेक ओढे-नाले पाईप टाकून बुजविण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी नाल्यांची दिशा बदलविण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरते. याबाबत अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. गत आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनुसार येत्या दोन दिवसांत महापालिकेच्या सर्वच विभागांनी शहरातील ओढ्या-नाल्यांवरील अतिक्रमणे हटवावीत, असा आदेश आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी काढला आहे.

शहरातील ओढे-नाले पाईप टाकून बुजविल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चेंगडे यांनी मुख्यमंत्री, पंतप्रधान कार्यालयाकडे केली होती. तसेच, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला. याबाबत गेल्या आठवड्यात जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात ओढ्या-नाल्यांवरील आणि सीना नदीतील अतिक्रमणे टप्प्याटप्याने हटविण्याची चर्चा झाली. सीना नदीची हद्दनिश्चिती कुकडी पाटबंधारे विभागाचे अभियंता माने करणार आहेत.

त्यांना महापालिकेच्या अधिकार्‍यांनी मदत करावी. खांब रोवून हद्द निश्चित करून घ्या. सुमारे 45 ओढे-नाले दोन दिवसांत खुले करण्याची तयारी करा, असे आदेश काढण्यात आले. त्यासाठी कर्मचार्‍यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. तसा आदेश नगररचना विभाग, अतिक्रमण विरोधी विभाग, पाणीपुरवठा विभाग, विद्युत विभाग, शहर अभियता, सार्वजनिक बांधकाम विभागांना दिला आहे.

कोणी काय करावे…

अतिक्रमणविरोधी विभाग : नदी, ओढे, नाले प्रवाह मोकळा करणे, अतिक्रमण काढणे यासाठी आवश्यक साहित्यासह कर्मचार्‍यांनी उपस्थित राहावे. सीना नदीची हद्द दाखविणार्‍या पक्क्या खुणा कराव्यात.

बांधकाम विभाग : निशाणी करण्यासाठी सिमेंट काँक्रीटचे पोल लावणे, त्यास रंग देणे याकरिता आवश्यक कामगार व साहित्य यासह उपलब्ध करून द्यावेत.

पाणीपुरवठा विभाग : बंद पाईप काढताना पिण्याची पाईपलाईन तूटफूट झाल्यास तत्काळ पर्यायी व्यवस्था करून दुरुस्ती करणे. त्या भागातील फिटर, व्हॉल्व्हमन कार्यवाहीच्या वेळी उपस्थित राहणे आवश्यक.

विद्युत विभाग : विद्युत विभागाचे खांब, तारा याबाबत प्रश्न निर्माण झाल्यास कर्मचारी, वायरमन, इंजिनीअर उपलब्ध ठेवून वीजपुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घेणे.

Back to top button