नेवासा : मुरकुटे गटाचा पॅनेल लंगडा, गडाखांची संपर्क मोहीम | पुढारी

नेवासा : मुरकुटे गटाचा पॅनेल लंगडा, गडाखांची संपर्क मोहीम

नेवासा; पुढारी वृत्तसेवा : नेवासा बाजार समिती निवडणुकीत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे गटाचा पॅनेल लंगडा झाला असून, आमदार गडाख थेट मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. शेवटच्या टप्प्यात भाजपकडून अर्ज दाखल होत नसल्याचे दिसल्याने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी पुढाकार घेतल्याने गडाख गटाविरोधात विरोधी अर्ज आले.
नेवासा बाजार समितीमध्ये अनेक वर्षांपासून गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली काम चालू आहे. विधानसभेची रंगीत तालीम म्हणून या

निवडणुकीकडे पाहिले जात आहे. तालुक्यातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक मतदार आहेत. आमदार शंकरराव गडाख सध्या तालुका पिंजून काढत आहेत. गडाखांनी दोन वर्षांपूर्वी राज्य सरकार व केंद्राच्या जलजीवन मिशन योजनेत सुमारे 250 कोटीच्या पाणी योजना मंजूर केल्या. त्यावेळेस पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी घोडेगाव येथे समक्ष येऊन मंजुरी पत्र गडाखांकडे दिले होते. आमदार गडाखांनी आपली कार्यपद्धती बदलेली आहे.

त्यांनी मतदारांकडे जाऊन थेट संपर्क सुरू केल्याने गडाख गटाचे गावातील नेते त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. ही गोष्ट त्यांना विधानसभेला डोकेदुखी ठरणार आहे. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व विठ्ठलराव लंघे यांच्यात उमेदवारीसाठी चुरस असून, मुरकुटेंना त्यांच्या गावातील उपसरपंचासह अनेक कार्यकर्ते सोडून गेले आहेत. तसेच, एक वर्षांपूवी देवगाव सोसायटीच्या निवडणुकीत त्यांना पॅनेल देता आला नाही, याची मोठी चर्चा भाजपच्या वरिष्ठ पातळीवर झाली.

भाजपची सत्ता येऊनही कुणीही त्यांच्याकडे प्रवेश केला नाही. याउलट गडाखांचे मंत्रिपद गेले तरी कुणीही गडाखांना सोडले नाही. माजी आमदार मुरकुटेंनी संघटना बांधणीवर लक्ष देण्याऐवजी मुळा शैक्षणिक संस्था, दूध संघ, कारखान्यावर लक्ष दिल्याने गडाखांना सहानभूती मिळाली, असे तालुक्यात खुलेआम बोलले जात आहे. या सर्व गोष्टींमुळे नेवासा बाजार समितीची निवडणूक कुणाच्या ताकदीवर लढायची, असा मोठा मतप्रवाह नेवासा भाजपमध्ये आहे. म्हणून एका मोठ्या मंत्र्याने लंघेंचा चेहरा पुढे केला आहे.

विधानसभेसाठी माळ कुणाच्या गळ्यात
विधानसभेसाठी नेवासा भाजपमध्ये माजी आमदार भानुदास मुरकुटे, बाळासाहेब मुरकुटे व विठ्ठलराव लंघे यांच्यात मोठी चुरस असून, उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उलट सुलट चर्चा तालुक्यात आहे.

Back to top button