नगर : शेतकर्‍यांना सुविधांपासून वंचित ठेवले : आमदार मोनिका राजळे | पुढारी

नगर : शेतकर्‍यांना सुविधांपासून वंचित ठेवले : आमदार मोनिका राजळे

करंजी : पुढारी वृत्तसेवा :  मागील पंचवार्षिकला बाजार समितीच्या मतदारांनी सत्ता बदल करून पाहिला. परंतु, मतदार तसेच सर्वसामान्य शेतकरी यांच्या सुविधांबाबत कुठेही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. केवळ सत्ताधार्‍यांनी स्वतःचा स्वार्थ साधण्याचे काम केल्याने त्यांच्यातच मतभेद पाहायला मिळाले. प्रत्येक जण आपले हित पाहण्याच्या प्रयत्नात शेतकर्‍यांचे हित मात्र विसरून गेला, अशा शब्दात आमदार मोनिका राजळे यांनी पाथर्डी बाजार समितीच्या सत्ताधार्‍यांवर निशाणा साधला.

मिरी-करंजी जिल्हा परिषद गटातील सरपंच, उपसरपंच, सेवा संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, संचालक व शेतकरी यांची संयुक्त बैठक चिचोंडी येथे पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री शिवाजी कर्डिले होते. यावेळी कर्डिले व राजळे यांनी प्रत्येक गावच्या ग्रामपंचायत व सेवा संस्थेच्या पदाधिकार्‍यांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांच्याशी उमेदवार निश्चितीबाबत चर्चा केली. पंधरा जागांसाठी सुमारे दीडशे उमेदवारांनी अर्ज भरलेले असून, ही निवडणूक जिंकण्यासाठी काही उमेदवारांना मोठ्या मनाने माघार घ्यावी लागणार आहे. ही निवडणूक भाजप पक्षाची आहे असे मानून, प्रत्येकाने या निवडणुकीत सक्रिय होण्याचे आवाहन माजी मंत्री कर्डिले यांनी केले.

पाथर्डी बाजार समितीचा कारभार पारदर्शक नसल्यामुळे व शेतकर्‍यांना सोयीसुविधा मिळत नसल्याने या तालुक्यातील शेतकरी नगर बाजार समितीत येतात. मागील पाच वर्षांत जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता होती. टक्केवारी घेऊन कारभार करण्यात आला. घराणेशाही व राजकारणात मोठे नाव असणार्‍यांना देखील टक्केवारीचा मोह आवरला नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेत देखील भाजपची सत्ता येणार आहे. त्या अगोदर बाजार समितीत बदल घडवून आणण्यासाठी क्षणिक विचार न करता शेतकर्‍यांना केंद्रबिंदू मानून चांगल्या सुविधा देणार्‍या व पारदर्शक कारभार करणार्‍या भाजपाकडे सत्ता असणे महत्त्वाचे आहे, असे कर्डिले म्हणाले.

पाथर्डी तालुका दुष्काळी असतानाही वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना अगदी व्यवस्थितपणे चालविण्याचे काम राजळे कुटुंबाने केले. अनेक तोट्यातील संस्था ऊर्जितावस्थेत आणण्याचे काम केले, असेही ते म्हणाले. या प्रसंगी मिरी-तिसगाव नळ योजनेचे अध्यक्ष एकनाथ आटकर, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष बाळासाहेब अकोलकर, माजी सभापती उद्धवराव वाघ, माजी जि. प. सदस्य पुरुषोत्तम आठरे, सुरेश चव्हाण, संतोष शिंदे, वैभव खलाटे, बंडू पाठक, राजेंद्र दगडखैर, चेअरमन सुरेश पवार, साहेबराव गवळी, महादेव कुटे, अण्णासाहेब शिंदे, संभाजीराव वाघ, सुभाषराव बर्डे, चारुदत्त वाघ, अ‍ॅड. वैभव आंधळे, जिजाबापू लोंढे, दिगंबर कराळे, बापूसाहेब घोरपडे, बाबाजी पालवे, बाळासाहेब घोरपडे, सरपंच सचिन शिंदे, रावसाहेब वांढेकर, अशोक तनपुरे, प्रदीप टेमकर, दिलीप गिते, बापूराव घोरपडे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

कोनशिला कोणत्या कोपर्‍यात पडली?
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मोठा गाजावाजा करत बाजार समितीच्या शेतकरी मॉलचे भूमिपूजन करण्यात आले. अद्याप या ठिकाणी एक वीट लावण्यात आली नाही. कोनशिला कोणत्या कोपर्‍यात पडली हे माहित नाही. शेतकर्‍यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. बैल बाजारात सावलीसाठी एक झाड नाही. त्यांनी केवळ पोकळ आश्वासन देण्याचे काम केले, अशी टीका आमदार राजळे यांनी केली.

Back to top button