संगमनेर : दुचाकीस्वारांसह महिलेवर बिबट्याने केला हल्ला | पुढारी

संगमनेर : दुचाकीस्वारांसह महिलेवर बिबट्याने केला हल्ला

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर -जोर्वे रस्त्याने जाणार्‍या दोन दुचाकीस्वारांसह एका पादचारी महिलेवर शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढविला. दुचाकीस्वारांसह महिला जखमी झाली. कोल्हेवाडी शिवारामध्ये ही घटना शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली. संगमनेरातील नवीन नगर रोड येथे व्यापारी प्रवीण नागरे व फळ विक्रेता निसार सौदागर हे दोघे संगमनेर ते जोर्वे रस्त्याने दुचाकीवरुन कनोली गावाकडे जात होते. कोल्हेवाडी शिवारात शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक प्रवीण नागरे व निसार सौदागर यांच्या दुचाकीवर झडप घालून जोरदार हल्ला चढविला. जखमींना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

संगमनेर शहरालगत कोल्हेवाडी जोर्वे व निंबाळे या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. उसामध्ये बिबट्यांना लपण्यास जागा असल्यामुळे बिबट्यांचे प्रमाण जास्त आहे. रात्री या भागातून जाणार्‍या वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. कधी बिबट्या येईल अन् कधी हल्ला करील, हे सांगता येत नाही. यामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गंभीर बाबीची दखल घेऊन तत्काळ पिंजरा लावावा, अशी मागणी जखमी प्रवीण नागरे व निसार सौदागर यांनी वन अधिकार्‍यांकडे केली आहे.

शहरातही आता बिबट्याचे दर्शन !
संगमनेरातील घुलेवाडी परिसरात एकता चौकात बिबट्याचे मागील दोन आठवड्यांपूर्वी दर्शन झाले होते. यानंतर पुन्हा अवघ्या आठ दिवसात नाशिक महार्गावर संगमनेर महाविद्यालयाच्या भिंतीजवळ बिनधास्त बसलेल्या बिबट्याचे येणार्‍या- जाणार्‍या नागरिकांना दर्शन झाले. आता जोर्वे रोडवर बिबट्या आल्याने ग्रामीण भागासह शहरात भितीचे वातावरण आहे.

Back to top button