‘त्यांना’ जनताच जागा दाखवेल ; खासदार सुजय विखे | पुढारी

‘त्यांना’ जनताच जागा दाखवेल ; खासदार सुजय विखे

नगर : पुढारी वृत्तसेवा :  ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी जिवाची पर्वा न करता काम केले, अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा महाविकास आघाडीमधील नेते सातत्याने अपमान करत आहेत. यातून त्यांची वृत्ती व विचार दिसतात. जनताच त्यांना त्यांची जागा दाखवेल. भाजप राष्ट्रपुरुषांच्या अपमान कधीही सहन करणार नाही, असा इशारा खासदार सुजय विखे यांनी दिला. भाजप-शिवसेना युतीच्या वतीने शनिवारी (दि.8) सकाळी शहरातून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, अ‍ॅड.अभय आगरकर, वसंत लोढा, शहरप्रमुख दिलीप सातपुते आदींनी पुष्पहार अर्पण करून यात्रेस प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून चौपाटी कारंजा येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याजवळ यात्रेचा समारोप झाला.

याठिकाणी खासदार विखे यांनी सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यात्रेत भाजप- सेना युतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते भगव्या टोप्या घालून सहभागी झाले होते. भारत माता की जय, वंदेमातरम, मी सावरकर…मी पण सावरकर, अशा घोषणा यात्रे दरम्यान देण्यात आल्या. यावेळी महेंद्र गंधे, दिलीप सातपुते म्हणाले, अभय आगारकर, वसंत लोढा आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भाजपचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले, सेनेचे जिल्हाप्रमुख बाबूशेट टायरवाले, सुनील रामदासी, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, विवेक नाईक, ज्ञानेश्वर काळे, महेश तवले, तुषार पोटे, महेश नामदे, अजय चितळे, बाळासाहेब गायकवाड, सुरेखा विद्ये, प्रिया जानवे आदी उपस्थित होते.

Back to top button