नगर : पोलिसांचे कंट्रोल सुटले ; खासदार डॉ. सुजय विखे यांनी पोलिस प्रशासनाला सुनावले ‘खडे बोल’ | पुढारी

नगर : पोलिसांचे कंट्रोल सुटले ; खासदार डॉ. सुजय विखे यांनी पोलिस प्रशासनाला सुनावले ‘खडे बोल’

नगर : पुढारी वृत्तसेवा :  सध्या सणोत्सवाचा काळ सुरू असून, काही दिवसांपासून दोन गटांत वाद होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. शुक्रवारी (दि.7) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेेल्या शांतता समितीच्या बैठकीत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पोलिस प्रशासनाला खडे बोल सुनावले. तडीपारीचे केवळ आदेश निघतात, त्यांच्यावर पोलिसांचे कुठलेही नियंत्रण नसल्याचे ते म्हणाले. कायदा व सुव्यवस्थेला धरून एकप्रकारे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या कामकाजावरच डॉ. विखे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

शहरात दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकल्याच्या घटना काही दिवसांपासून घडत आहेत. वारुळवाडी येथील घटनेमुळे शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. आगामी काळही सणोत्सवाचा आहे. या काळात शहरासह जिल्ह्यात शांतता राहावी यासाठी शुक्रवारी (दि. 7) शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अध्यक्षस्थानी होते. आमदार बबनराव पाचपुते व लहू कानडे, विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्यासह सर्व जाती-धर्मांतील प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या.

गेल्या काही दिवसांत नगर शहरात घडलेल्या घटनांबाबत खासदार डॉ. विखे यांनी पोलिस प्रशासनाला कडक भाषेत निर्देश दिले. कोणत्याही परिस्थितीत पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक असला पाहिजे, दंगल घडवणार्‍या समाजकंटकांना कोणी पाठीशी घालत असेल तर, पोलिस प्रशासनाने राजकीय दबावाला बळी न पडता कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

पंधरा दिवसांत 350 सीसीटीव्ही कॅमेरे
नगर शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने येत्या पंधरा दिवसांत 350 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ. विखे यांनी दिली. पुढील तीन महिन्यांत आणखी 350 कॅमेरे लावण्यात येतील. त्यांचे नियंत्रण पोलिस अधीक्षक कार्यालयातून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पीआय फोन घेत नाही
खासदार डॉ. विखे यांनी पोलिस ठाण्यांमधील मनमानी कारभारावरही ताशेरे ओढले. सामान्यांना तक्रार करायची असल्यास पीआय (पोलिस निरीक्षक) फोन उचलत नाहीत, पोलिस ठाण्यात सामान्यांचे काहीही ऐकून घेतले जात नाही, अशी नाराजी व्यक्त केली. नागरिकांना तक्रार दाखल करण्यासाठी हेल्पलाईन तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली.

एसपी साहेब, ‘स्ट्रिक्ट अ‍ॅक्शन’ घ्या!
पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मवाळ भूमिकेबाबत डॉ. विखे म्हणाले की, ‘एसपी साहेब, तुम्ही थोडं स्ट्रिक्ट झालं पाहिजे. तुम्ही मवाळ भूमिका घेत आहात. समाजकंटक जोपर्यंत वाजवले जात नाहीत, तोपर्यंत हे शांत होणार नाहीत. इतर पोलिस अधिकार्‍यांनीही कारवाई करावी.

एसपींनी बोलावली ‘क्राईम मिटिंग’
शांतता समितीच्या बैठकीनंतर पोलिस अधीक्षक ओला यांनी पोलिस अधिकार्‍यांची ‘क्राईम मिटिंग’ घेतली. गुन्ह्यांचा आढावा घेण्यासोबतच पोलिस अधिकार्‍यांना एसपींनी काही सूचना केल्या. ‘सणोत्सवाच्या काळात पोलिसांचा दरारा दिसू द्या’, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

Back to top button