नगर : अन् 49 विद्यार्थी थोडक्यात बचावले..! | पुढारी

नगर : अन् 49 विद्यार्थी थोडक्यात बचावले..!

काष्टी : पुढारी वृत्तसेवा : दुपारी दोन-अडीचची वेळ. शाळेच्या पडवीत गुरुजींसह जेवत बसलेल्या चाळीसेक विद्यार्थ्यांचे जेवण झाले. मग गुरुजींच्या आदेशानुसार विद्यार्थी लगोलग वर्गात जाऊन बसले आणि काही क्षणांतच ते बसले होते तिथे मोठ्ठा आवाज झाला… गुरुजींसह सारे पुन्हा बाहेर आले. पाहतात तर काय, त्या पडवीच्या छताचा भाग कोसळला होता. या चिमुकल्या विद्यार्थ्यांना घटनेचे गांभीर्य किती कळले, ठाऊक नाही; पण गुरुजी डोक्याला हात लावून ढळाढळा आसवे गाळू लागले…

काष्टी (ता. श्रीगोंदा) येथे चौधरी मळ्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ही घटना. कोणालाच इजा न झाल्याने अधिकारी आणि पुढार्‍यांच्या लेखी किरकोळीत मोडणारी. पण, आसवे गाळणार्‍या त्या गुरुजींच्या आणि त्या चाळीसेक चिमुरड्यांच्या आई-वडिलांच्या काळजाचा ठोका चुकवणारी अशीच. स्लॅबचे कोसळलेले हे प्लास्टर खाली बसलेल्या चिमुरड्यांसाठी जीवघेणे ठरले असते, या भीतीनेच त्यांची गाळण उडाली. तूर्तास 49 विद्यार्थ्यांचा जीव वाचला हेच नक्की.

बुधवारी (दि. 29) घडलेली ही घटना त्या दिवशी ढसाढसा रडणारे मुख्याध्यापक लक्ष्मण शेंडे अजिजीने ग्रामस्थांना सांगत आहेत आणि तुमच्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी तरी शाळा खोल्यांच्या अवस्थेकडे लक्ष द्या, असे आर्जव करत आहेत. श्यामराव टिमुणे, रामदास पाचपुते, श्याम जगदाळे अशा काही ग्रामस्थांना बोलावून त्यांनी परिस्थिती दाखवली आणि आता त्याची दखल कोण घेणार, याची प्रतीक्षा करत आहेत…

बांधकामच निकृष्ट
सन 2000 मध्ये तत्कालीन आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या निधीतून या एकाच शाळाखोलीचे बांधकाम झालेे. परंतु हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले. त्याबाबत रामदास पाचपुते यांनी पंचायत समिती शिक्षण विभागाला आतापर्यंत तीनदा शाळा तपासणीचा अर्ज केला. पण अधिकार्‍यांनी अद्याप ते अर्ज गाभीर्याने घेतले नाहीत.

51 जीव टांगणीला
पन्नास वर्षांपासून असलेल्या या शाळेत लक्ष्मण शेंडे व ज्योती भिसे हे दोन शिक्षक आणि पहिली ते चौथीची 27 मुले व 22 मुली अशी पटसंख्या आहे. परंतु शाळेला सुरक्षित इमारत नाही. बावीस वर्षांपूर्वी बांधलेल्या या खोलीच्या पडवीतील स्लॅबचा भाग कोसळला. आता वर्गातील स्लॅबही फुगला आहे. तो कधी कोसळेल याचा नेम नाही. त्यामुळे तिथे रोज बसणारे 51 जीव टांगणीला आहेत…

निंबोडीच्या कडू आठवणी
निंबोडी (ता. नगर) इथे शाळाखोली कोसळून झालेल्या अपघाताच्या कडू आठवणींनी अजूनही अंगावर शहारे येतात. तशा अप्रिय घटनेची प्रतीक्षा अधिकारी करत आहेत का, असा प्रश्न ग्रामस्थांनी यानिमित्ताने उपस्थित केला आहे. याबाबत पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकार्‍यांना निवेदन देणार असल्याचे शाळा समितीच्या अध्यक्ष सीमा शैलेश पाचपुते यांनी सांगितले.

…त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे़?
आमदार बबनराव पाचपुते, माजी सभापती अरुणराव पाचपुते, माजी सभापती लताताई पाचपुते, माजी सरपंच जालिंदर पाचपुते व सरपंच साजन पाचपुते यांच्या ग्रामपंचायत वार्डातील म्हणजे वॉर्ड क्रमांक एकमध्ये ही जिल्हा परिषद शाळा आहे, हे विशेष. अर्थात कार्यबाहुल्यामुळे यापैकी कोणीही ‘किरकोळीत मोडणार्‍या’ या घटनेकडे लक्ष दिले नसावे, असे म्हणावे लागेल.

Back to top button