राहुरी : महसूल विभागाकडून केवळ 63 टक्के वसुली | पुढारी

राहुरी : महसूल विभागाकडून केवळ 63 टक्के वसुली

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसानार 1109 कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट्य साध्य करण्यात राहुरी महसूल विभाग अडखळल्याचे चित्र आहे. महसूल विभागाने केवळ 63 टक्के वसुली केल्याचे चित्र आहे. 694 कोटी रुपये शासकीय तिजोरीत जमा करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यापासून गौण खनिज कारवाईला थांबा देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

राहुरी महसूल विभागाला जमीन महसूल व गौण खनिज वसुलीचे उद्दिष्ट्ये देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांनी 1109 कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितले. यासाठी तहसीलदार फसियोद्दीन शेख, नायब तहसीलदार संध्या दळवी, पुनम दंडिले, सचिन औटी यांच्या मार्गदर्शनात सर्व मंडळाधिकारी व तलाठी यांच्या खांद्यावर वसुलीचे उद्दिष्ट्ये सोपविण्यात आले.

दरम्यान, गेल्या तीन महिन्यांपासून राहुरी महसूल विभागात वसुलीबाबत मरगळ आल्याचे चित्र आहे. जमीन महसूल वगळता गौण खनिज कारवाईबाबत महसूल पथकाने वाळू, मुरूम तस्करांना मोकळीक देऊन टाकल्याचे दिसून आले आहे. परिणामी महसूल दप्तरामध्ये जानेवारी महिन्यामध्ये वाळू तस्करीची एकही कारवाई झाली नसल्याची माहिती नमूद आहे. तर केवळ मुरूम वाहणार्‍या एका ट्रॅक्टरवर महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सुरक्षा रक्षकांनी कारवाई करीत तो ट्रॅक्टर महसूलकडे सुपूर्द केला आहे.

यासह राहुरी तालुक्यात दोन ठिकाणी नगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाच्या पथकाने कारवाई करीत अवैध वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई केली. विद्यापीठ सुरक्षारक्षक व स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाच्या मदतीने तुरळक दंड वसुली करत महसूल विभागाने नाकर्तेपणा लपविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले आहे.

राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर, डिग्रस, वळण, मानोरी, आरडगाव, तांदूळवाडी, कोंढवड, शिलेगाव, देसवंडी, लाख, जातप, सोनगाव, सात्रळ आदी गावातील मुळा व प्रवरा नदी पात्रातून राजरोसपणे वाळू उपसा होत असल्याचे दिसून आले. याबाबत महसूल विभागाशी संपर्क साधूनही कारवाई झाली नाही. त्याउलट महसूल प्रशासनाला माहिती देणार्‍याचे नाव वाळू तस्करांपर्यंत पोहोच करण्याचे कृत्य झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाशी सलगी राखत वाळू तस्करांनी राहुरी तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा वाळू उपसा करूनही तीन महिन्यात कोणतीही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

जमीन महसूल व इतर शासकीय प्रकल्पाच्या कामकामातून राहुरी महसूल विभागाने वसुलीसाठी पुढाकार घेतला. यामध्ये रेल्वे विभागाने नुकतेच 1 कोटी 18 लक्ष रुपये तसेच निळवंडे प्रकल्पाचे काम करीत असलेल्या ठेकेदार कंपनीने 57 लक्ष रुपयांचा महसूल अदा केल्याने वसुली आकड्यात वाढ झाली.

राहुरी महसूल विभागाची यंदा वसुलीत झालेली घट चर्चेची ठरणारी आहे. मार्च अखेरीचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राहुरी महसूल विभागाची वसुलीची आकडेवारी यंदा जिल्ह्यात खालच्या क्रमांकाची राहणार असेच काही चित्र आहे. महसूल विभागाने गौण खजिन तस्करांवर कारवाई करण्याबाबत हात वर केलेले आहे. अधिकार्‍यांच्या आदेशालाही न जुमानता मंडळाधिकारी व तलाठी यांनी गौण खनिज तस्करांना एकप्रकारे छुपा पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. एकीकडे वाळू लिलाव बंद तर दुसरीकडे अवैध गौण खनिजावर कारवाई होतच नसल्याने राहुरी महसूल विभागाची आकडेवारी घसरली आहे.

वाळू धोरणाबाबत संभ्रमावस्था
राहुरी तालुक्यामध्ये यंदा वाळू लिलाव पूर्णपणे ठप्प राहिले. केवळ चोरट्या मार्गानेच वाळू उपसा झाला. दरम्यान, शासनाकडून वाळू उपशाबाबत नवीन धोरण जाहीर होणार असल्याचे बोलले जात आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजार रुपयांमध्ये शासनाकडून ब्रास वाळू असे धोरण आखले जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे शासनाच्या गौण खनिज धोरणाबाबत लवकर परिपत्रक जाहीर व्हावे, अशी अपेक्षा जनसामान्यांना लागली आहे.

Back to top button