शेवगाव : परमिट रूमच्या परवान्यासाठी ‘हेराफेरी’; बनावट कागदपत्रांचा वापर | पुढारी

शेवगाव : परमिट रूमच्या परवान्यासाठी ‘हेराफेरी’; बनावट कागदपत्रांचा वापर

शेवगाव तालुका; पुढारी वृत्तसेवा : नगरपरिषदेच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परमिट रूमचा परवाना घेणार्‍यावर शेवगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शेवगाव शहरातील गेवराई रस्त्यावरील हॉटेल सरगमसाठी बनावट कागदपत्राच्या आधारे परमिट रूमचा परवाना घेतल्याचे चौकशी अंती समोर आले. याबाबत नगरपरिषदेचे कर्मचारी अशोक सुपारे यांनी फिर्याद दिली. यावरून मनोज भगवान आहुजा (रा. शेवगाव) याच्यावर शेवगाव पोलिसांनी शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

शहरातील गेवराई रस्त्यावरील हॉटेल सरगममधील परमिट रुमचा परवाना खोट्या कागदपत्राच्या आधारे घेण्यात आल्याचा 13 ऑगस्ट 2021 रोजी तक्रारी अर्ज एका व्यवतीने जिल्हाधिकार्‍यांना सादर केला होता. या अर्जाची राज्य उत्पादन शुल्कच्या उपअधीक्षक अधिकार्‍यांमार्फत चौकशी करण्यात आली. चौकशीत अनेक त्रुटी आढळून आल्या. हॉटेल सरगमच्या परमिट रुम परवाना मंजुरीस अज्ञात साथीदारांच्या मदतीने शेवगाव नगरपरिषदेचे बनावट दाखले व ठरावाची प्रत देऊन राज्य नगरच्या उत्पादन शुल्क विभागाकडून परवाना हस्तगत केला.

कागदपत्रांवर काय काय खोटे
परवान्यासाठी 7 जानेवारी 2019 रोजी बांधकाम पूर्णत्वाचा दिलेला दाखला नगरपरिषदेने दिला नाही. त्यावर तत्कालीन मुख्याधिकार्‍यांच्या खोट्या सह्या आहेत. 16 जानेवारी 2019 रोजी नाहरकत दाखला, स्वच्छता दर्जा दाखला, लोकसंख्येचा दाखला अशी कागदपत्रेही खोटी आहेत. त्यावर तत्कालीन मुख्याधिकार्‍यांच्या बनावट सह्या आहेत. तर, परवान्यास दिलेला 29 जानेवारी 1920 रोजीचा नगरपरिषद ठराव क्रमांक 27 हा नगरपरिषदमार्फत देण्यात आलेला नसल्याचे आढळून आले.

बनावट कागदपत्र तयार करणारे ठग
शहरात इतर काही परमिट रुम परवान्यास अशाच पद्धतीने खोटी कागदपत्र सादर केल्याचा संशय आहे. अशी कागदपत्र तयार करणारे काही ठक शहरात असून, नगरपरिषदेचे कर्मचारी यात सामिल असण्याची शक्यता असल्याने या प्रकारची चौकशी करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.

Back to top button