पाथर्डी तालुका : महिलांनी केला ‘हाफ तिकीट’ प्रवास | पुढारी

पाथर्डी तालुका : महिलांनी केला ‘हाफ तिकीट’ प्रवास

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : महिलांना 50 टक्के एसटी प्रवासात सवलत राज्य सरकारने जाहीर केली आहे. यानंतर पाथर्डी आगारातील बसमधून 12 दिवसांत सुमारे 39 हजार 446 महिलांनी सवलतीच्या दारात प्रवास केला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यात सवलती देण्यात येतात. त्यानंतर आता (ता. 17) मार्चपासून परिवहन महामंडळाच्या सर्वच बसेसमध्ये महिलांना प्रवासी भाड्यात 50 टक्के सवलत देण्याची ‘महिला सन्मान योजना’ सुरू झाली.

17 ते 28 मार्च या बारा दिवसांत पाथर्डी आगारअंतर्गत 39 हजार 446 महिलांनी या सवलतीचा लाभ घेतला, अशी माहिती आगारप्रमुख आरिफ पटेल यांनी दिली. ग्रामीण भागातील महिला कामानिमित्त मोठ्या संख्येने पाथर्डी शहरात येतात. तसेच, सर्वमान्य नागरिकांना लालपरी प्रवास महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे ‘एसटी’ बसने प्रवास करणार्‍यांची संख्या अधिक आहे.

राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना महिलांना सन्मान योजनेंतर्गत 50 टक्के सवलतीची घोषणा केली होती. त्याचा फायदा महिलांना होत असून, खासगी गाड्यांचा वापर यातून कमी होऊन इंधनाची ही बचत होणार आहे. त्यामुळे इंधन बचत झाल्यावर देशाची ही आर्थिक बचत यातून होत आहे.

अकडे बोलतात!
17 मार्च (1459), 18 मार्च (2953), 19 मार्च (3129), 20 मार्च (3345),21 मार्च (3783), 22 मार्च (3050), 23 मार्च (3665), 24 मार्च (3756),25 मार्च (3719), 26 मार्च (3480), 27 मार्च (3921), 28 मार्च (3186).

Back to top button