नेवासा : अतिवृष्टी नुकसान भरपाईत भेदभाव | पुढारी

नेवासा : अतिवृष्टी नुकसान भरपाईत भेदभाव

नेवासा; पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्यात सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतानाही, नेवासा बुद्रुकसह पाच महसूल मंडळांना शासकीय अनुदानातून वगळण्यात आले आहे. आठपैकी फक्त तीनच महसूल मंडळांना नुकसान भरपाई मिळणार आहे. तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात पावसाचा सर्वांना फटका बसलेला आहे. मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. मात्र, नुकसान भरपाईत भेदभाव झाल्याने शेतकर्‍यांत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सरसकट सर्वांना भरपाई देण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

नेवासा तालुक्यात सन 2022 मध्ये सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसामुळे सर्वांत मोठे नुकसान झाले. तालुक्यात या दोन महिन्यात परतीच्या पावसाने थैमान घातले होते. त्याच आधाराने महसूल व कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. त्यात महसूल व कृषी विभागाच्या अहवालानुसार तालुक्यात 70 हजार शेतकर्‍यांच्या जवळपास 51 हजार 165 हेक्टर शेतातील पिके उद्ध्वस्त झाल्याचे समोर आले.

इतक्या मोठ्या प्रमाणावर तालुक्यात पिकांचे नुकसान होऊनही, तालुक्यात आठपैकी फक्त तीन महसूल मंडळांना शासकीय भरपाई अनुदान देण्यात आल्याचे दिसून येत आहे. नेवासा बुद्रुकमध्ये येणार्‍या गावांचे नुकसान होऊनही, या अनुदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. तसेच, पाचेगावाच्या फक्त नदी ओलांडताच इतर गावांतील पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई अनुदान हेक्टरी 27 हजार रूपये प्रमाणे जमा झाल्याचे समजते. यामुळे परिसरातील शेतकर्‍यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, अन्याय केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तालुक्यात नेवासा खुर्द, नेवासा बुद्रुक, सोनई, सलबतपूर, घोडेगाव, चांदा, वडाळा बहिरोबा, कुकाणा, ही आठ महसूल मंडळे आहेत. मात्र, संपूर्ण तालुक्यात परतीच्या पावसात प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. तरीही तीन महसूल मंडळांना नुकसान भरपाई म्हणून मदत देण्यात आली. त्यात सोनई, सलबतपूर व नेवासा खुर्द या महसूल मंडळातील गावांना मदत मिळणार आहे. महसूल व कृषी विभागातर्फे एकूण 139 कोटींचा नुकसानीचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर सादर केला. इतके नुकसान झाले असतानाही, इतर महसूल मंडळांना का वगळण्यात आले? असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.

तालुक्यातील पाचेगावमध्ये जवळपास 900 हेक्टरवर नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. परंतु, या अतिवृष्टी निधीपासून हे महसूल मंडळ वंचित राहिले आहे. वडाळा, चांदा आदी मंडळांत पिकांचे नुकसान झाले असताना, मदत मिळत नसेल तर शेतकर्‍यांनी काय करावे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तालुक्यातील उर्वरित महसूल मंडळांना शासनाने नुकसान भरपाई निधी उपलब्ध करावा, अशी मागणी पाच महसूल मंडळांतील शेतकर्‍यांनी केली आहे.

दुसर्‍या टप्प्यात नुकसान अनुदान
तालुक्यातील तीन महसूल मंडळे अतिवृष्टीत येतात. त्यामुळे येथील शेतकर्‍यांना नुकसान अनुदान शासनातर्फे देण्यात येते. परंतु, उर्वरित पाच महसूल मंडळे सततच्या पावसात येतात. दुसर्‍या टप्प्यात या शेतकर्‍यांनाही शासकीय नुकसान अनुदान प्राप्त होणार आहे. त्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे तहसीलदार संजय बिरादार यांनी सांगितले.

मदतीसाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न
तालुक्यातील तीन मंडळे अतिवृष्टीच्या छायेत येतात. त्यामुळे येथील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळाली आहे. उर्वरित पाच महसूल मंडळे सतत पावसाच्या छायेत येतात. त्यामुळे येथे मदत मिळाली नाही. येथील शेतकर्‍यांना मदतीसाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करण्यात येणार असल्याचे नेवाशाचे कषी अधिकारी दत्तात्रय डमाळे यांनी सांगितले.

Back to top button