पशुधन लस निर्मितीसाठी पुण्यात प्रयोगशाळा : महसूलमंत्री विखे | पुढारी

पशुधन लस निर्मितीसाठी पुण्यात प्रयोगशाळा : महसूलमंत्री विखे

शिर्डी; पुढारी वृत्तसेवा : पशुधनाच्या लस निर्मितीत स्वयंपूर्ण होण्यासाठी पुण्यात 70 कोटी रुपये खर्चून प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. सप्टेंबर 2023 पासून प्रत्यक्ष लसीच्या उत्पादनाला सुरुवात होणार असल्याची माहिती महसूल,पशुसंवर्धन मंत्री विखे-पाटील पाटील यांनी दिली. पशुधनाच्या सर्वांगिण विकासासाठी सरकार अत्यंत संवेदनशील असल्याचे ते म्हणाले.

शिर्डी येथे अखिल भारतीय पशु-पक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, खा. डॉ. सुजय विखे, शालिनीताई विखे, महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे, केशरताई पवार, कमलाकर कोते, राजेंद्र गोंदकर, कुलगुरू डॉ. शरद गडाख, डॉ. प्रशांतकुमार पाटील, आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, नितीन दिनकर, अर्चना कोते, अनिता जगताप उपस्थित होते.

मंत्री विखे म्हणाले, लम्पीसारख्या आजाराने पशुधनावर आक्रमण केले. त्यावेळी महाराष्ट्राने कमी कालावधीत विक्रमी दीड कोटी लसीकरण केले. 36 हजार पशुधन त्या आजाराने गिळंकृत केले. त्या पशु पालकांना नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकारने सुमारे 94 कोटींचा निधी खात्यावर वर्ग केला. राज्यात सुमारे 70 हजार शेतकरी कुक्कुट पालन व्यावसाय करतात. या व्यावसायिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न काही खासगी कंपन्यांनी केला. त्या कंपन्यांना राज्यातून हद्दपार करण्याचा कठोर निर्णय सरकार घेत आहे.

अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी-मेंढी विकास महामंडळाची स्थापना केली असून त्याचे मुख्यालय नगर येथे आहे. यासाठी 10 हजार कोटी रुपये अर्थ संकल्पात मंजूर करुन घेतले. हा व्यवसाय करणार्‍यांना 1 लाख 75 हजार रुपये बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे. देशात पशुधन लस निर्मितीसाठी पुण्यात 70 कोटी रुपये खर्च करून प्रयोगशाळा उभारली जात आहे. सप्टेंबरमध्ये ही प्रयोगशाळा सुरू होईल.

तेथून देशभर लस देण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे विखे यांनी सांगितले. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या खात्यात महिनाभराच्या आत नुकसान भरपाई रक्कम जमा करण्यात येईल, अशी ग्वाही कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली.
प्रदर्शनात आलेल्या घोड्यांबाबत बोलता-बोलता ‘संगमनेरी घोडा’ चांगला होता, असे मंत्री अब्दुल सत्तार म्हणताच एकच हशा पिकला.

घोडा कोणताही असो लगाम मात्र मंत्री विखे यांच्याकडेच असतो. विखे म्हणजे सत्ता केंद्र आहे, असे म्हणत मंत्री सत्तार यांनी शेरो- शायरी ऐकवली. खा. डॉ. सुजय विखे पा., सचिनद्र सिंग यांनी मनोगत व्यक्त केले. पशुधन डायरी, सुलभ शेळीपालन पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त शितलकुमार मुकणे यांनी प्रास्ताविक केले तर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे यांनी आभार मानले.

सावळीविहिरमध्ये पशु महाविद्यालय सुरू करू..!
सावळीविहिर परिसरात पशुधनाच्या नावे 65 एकर जागा आहे. त्या जागेत पशु महाविद्यालय सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिर्डीत लवकरच श्री साईबाबांच्या जीवनावर आधारित थीम पार्क निर्मिती केली जाणार असल्याची घोषणा मंत्री विखे यांनी यावेळी केली.

भेसळखोरांसाठी नवीन कायदा
राज्यात दूध भेसळीचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी शासनाकडे येत आहेत. जिल्ह्यातील एका बड्या दूध कंपनीची अशीच तक्रार आली असून चौकशी सुरु आहे. शासन लवकरच यावर कारवाई करणार आहे. भेसळ करणार्‍यांची माहिती नागरिकांनी पशुधनाच्या टोल फ्री क्रमांकावर द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. टोल फ्री क्रमांक लवकरच उपलब्ध होणार आहे. दूध भेसळीविरुद्ध शासन नवीन कायदा आणून कठोर कारवाई करणार आहे, असे मंत्री विखे यांनी ठणकावून सांगितले.

Back to top button