पाथडी : योग्य बांधणीमुळे जिल्हा बँकेत भाजपचा अध्यक्ष : खासदार डॉ. सुजय विखे | पुढारी

पाथडी : योग्य बांधणीमुळे जिल्हा बँकेत भाजपचा अध्यक्ष : खासदार डॉ. सुजय विखे

पाथडी तालुका; पुढारी वृत्तसेवा : पक्षांतर्गत मतभेद, कलह संघटनेसाठी अतिशय धोकादायक असून, त्याचे परिणाम आम्ही भोगले. लोकसभा अन् विधानसभा निवडणुकीनंतर भजपमध्ये वेगळ्या पद्धतीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी आमच्यावर आरोप-प्रत्यारोप केले. आम्ही लोकांवर केले. यानंतर मी वेगळी भूमिका घेऊन वैचारिक मतभेद मिटवून जिल्ह्यात संघटना बांधणीसाठी पुढाकार घेतला. याची योग्य बांधणी झाल्यामुळे अहमदनगर जिल्हा बँकेत आपण भजपचा अध्यक्ष करू शकलो, हे पक्ष संघटनेचे यश आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले.

पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी परिसरातील 14 गांवामधील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांच्या सुमारे 19 कोटी 64 लक्ष रुपये कामांचे रविवारी (दि.12) खासदार डॉ. विखे व आमदार मोनिका राजळे यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी राहुल राजळे, माणिक खेडकर, अर्जुन शिरसाठ, अभय आव्हाड, गोकुळ दौंड, अशोक चोरमले, धनंजय बडे, सुनील ओव्हळ, अजय रक्ताटे, भीमराव फुंदे, विष्णुपंत अकोलकर, बंडू बोरूडे, अ‍ॅड. प्रतीक खेडकर, राहुल कारखिले, काशीबाई गोल्हार, मंगल कोकाटे, प्रल्हाद कर्डिले, राधाकिसन कर्डिले, रामकिसन काकडे आदी उपस्थित होते.

डॉ. विखे म्हणाले, आमदार राजळे व मी पूर्ण ताकतीने संघटना मजबूत करण्याचे काम करणार. शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर आठच महिन्यात विकासाचा भरीव निधी मतदार संघात आला. पुढील एक वर्षात विकासाचा अनुशेष भरून काढला जाईल.
आमदार राजळे म्हणाल्या, केंद्र सरकार व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने ही पाणीपुरवठा योजना केली जात आहे. तालुक्यात या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी आला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे सहकार्य लाभले. या योजनेसाठी असलेली पाणीपट्टी भरून सहकार्य करावे, म्हणजे वर्षानुवर्षे ही योजना कार्यान्वित राहील. या भागात जिल्हा परिषद व आमदार निधीतून कामे केले आहे.

‘एकत्रित समन्वयाने काम करणार’
आमदार मोनिका राजळे व माझ्यामध्ये काही ठराविक कार्यकर्त्यांनी वेगळ्या पद्धतीचे वातावरण निर्माण करण्याचे काम केले. त्यामुळे येणार्‍या काळात आम्ही दोघेही एकत्रित समन्वयाने काम करणार आसल्याचेही विखे म्हणाले.

Back to top button