नगर : दोन दिवस अगोदरच गाढवांचा बाजार ; पंजाबी गाढवास लाखाचा भाव | पुढारी

नगर : दोन दिवस अगोदरच गाढवांचा बाजार ; पंजाबी गाढवास लाखाचा भाव

मढी : पुढारी वृत्तसेवा :  येथील चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त गाढवांचा बाजार यंदा दोन दिवस अगोदरच तिसगाव परिसरात भरला. त्यामुळे मढी येथील बाजारात गाढवांची टंचाई होऊन मोठी भाववाढ झाली. यंदा प्रथमच पंजाबमधून विक्रीसाठी गाढवे आली असून, एक पंजाबी गाढव सुमारे एक लाख रुपयाला विकले गेले. राज्यात माळेगाव, नांदेड, जेजुरी, देऊळगाव राजा व मढी येथे गाढवांचा बाजार भरतो. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा राज्यातूनही मढीच्या बाजारासाठी व्यापारी येतात. चतुर्थी, रंगपंचमी व नाथ षष्ठी असा तीन दिवस पूर्वीपासून मढी येथील गाढवांचा बाजार प्रचलित आहे.

मढी येथे यंदा नमुन्याला सुद्धा काठेवाडी गाढव पाहायला राहिले नाही. तुकाराम बीजेच्या दिवशी म्हणजे मढीच्या बाजाराच्या दोन दिवस अगोदर उलाढाल होऊन मढीच्या बाजारात अत्यंत तुरळक प्रमाणात गावरान गाढवे विक्रीसाठी आली. यावर्षीच्या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे यंदा पंजाबी गाढवे विक्रीसाठी आली. अत्यंत उंचेपुरे ताकदवान अगदी घोड्यासारखी दिसणारी पंजाबी गाढवे यात्रेचे खास आकर्षण ठरले. शनिवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान ती गाढवे खरेदी करून व्यापार्‍याने गावाकडे पाठविली. उत्तराखंड विशेषतः बद्रिनाथ, केदारनाथ, काश्मीरच्या परिसरात या गाढवांना खूप मागणी असते. लष्कराचे साहित्य डोंगराळ भागात अगदी सहजपणे व सुलभपणे वाहतूक करण्यासाठी याच गाढवांची मदत घेतली जाते. गाढवाची ही संकरित जात सध्या उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर उपयोगी ठरत आहे अशी माहिती करीम पहाडी उत्तराखंड यांनी दिली.

यंदाच्या मढीच्या गाढवांच्या बाजाराविषयी माहिती देताना दत्तू जाधव, सोमनाथ जाधव (कोल्हार) म्हणाले, दोन वर्षांच्या खंडानंतर पुन्हा गाढवांचा बाजार सुरू झाला. यंदा पंजाबी संकरीत गाढवांची सर्वाधिक किंमत येऊन दोन लाख 80 हजारांना तीन गाढवे विकली गेली. बांधकाम व्यवसाय, वीटभट्टी क्षेत्रात गाढवांचा वापर आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरतो. ओझे वाहण्याची गाढवाची क्षमता चांगली असल्याने मजुरीच्या खर्चातही बचत होते. गेल्या वीस वर्षांपासून आपण मढी येथील गाढवांच्या बाजारासाठी येतो. यंदा मात्र आवक खूपच कमी झाली आहे. काही माल बाजारापूर्वीच तिसगाव येथे विकला गेला. राज्याच्या सर्वच प्रमुख भागातून खरेदी विक्रीसाठी व्यापारी व ग्राहक येतात. रंग, वय, दातांची संख्या, उंची यावरून गावरान गाढवाची किंमत ठरते.

संगमनेर, श्रीरामपूर, बिडकीन, पाटोदा भागातील ग्राहकांनी यंदा बाजारात मालाची आवक कमी असल्याचे सांगितले. मढी येथील गाढवांच्या बाजाराचे आकर्षण गेल्या काही दिवसांपासून कमी होत आहे. दहा वर्षांपूर्वी गाढवांचा बाजारतळ गाढवांना उभे राहण्यासाठी सुद्धा पुरत नव्हता. आज परिस्थिती पूर्णपणे बदलून संपूर्ण बाजारतळ गाढवांविना ओस पडल्याचे जाणवले.

Back to top button