नगर : गावठी कट्ट्यासह तरुण पोलिसांच्या जाळ्यात | पुढारी

नगर : गावठी कट्ट्यासह तरुण पोलिसांच्या जाळ्यात

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  राहुरी तालूक्यातील धामोरी शिवारात एक तरूण चालत्या रेल्वेतून खाली पडला आणि जखमी झाला. त्याच्या मदतीसाठी परिसरातील काही नागरिक धावून आले. मात्र त्याच्या जवळ गावठी कट्टा आढळून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर आर्मअ‍ॅक्टचा गुन्हा दाखल केला आहे. दिनांक 28 फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजे दरम्यान एक तरुण रेल्वेतून प्रवास करीत असताना राहुरी तालूक्यातील धामोरी शिवारात तो रेल्वेतून खाली पडला. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक फौजदार चंद्रकांत निवृत्ती बर्‍हाटे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तो तरूण जखमी अवस्थेत खाली पडलेला दिसून आला. त्याच्या जवळच त्याची बॅग पडलेली होती.

पोलिसांनी ती बॅग ताब्यात घेऊन तपासली असता त्या बॅगेत 56 हजार रुपये रोख रक्कम व 20 हजार रुपये किंमतीचा एका गावठी कट्टा असा एकूण 76 हजार रूपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी गावठी कट्ट्या बाबत त्या तरूणाला चौकशी केली असता त्याने कट्ट्याबाबत काहीच माहिती दिली नाही. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे नाव पृथ्वीराजे मुरलीधर निंबाळकर (राहणार अदरकिनी, ता. फलटन, जि. सातारा) असे सांगीतले. तो तरूण जखमी अवस्थेत असल्याने पोलिसांनी त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले.

सहाय्यक फौजदार चंद्रकांत निवृती बर्‍हाटे यांच्या फिर्यादीवरून काल दिनांक 7 मार्च रोजी आरोपी पृथ्वीराजे मुरलीधर निंबाळकर याच्यावर गुन्हा शस्त्र अधिनियम 1959 कलम 25, 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 

Back to top button