कोपरगाव : गोदावरी डावा कालव्याला भगदाड | पुढारी

कोपरगाव : गोदावरी डावा कालव्याला भगदाड

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा दारणा धरणाच्या डाव्या कालव्याला ब्राह्मणगाव शिवारात मोठे भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. शेजारच्या शेतात पाणी गेल्याने शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकर्‍यांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या भागातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून ब्रिटिशांनी शंभर वर्षांपूर्वी या कालव्यांची निर्मिती केली. परंतु ही कालवे बांधताना अतिशय सुंदर दगडी बांधकाम केले होते.

त्यामुळे शंभर वर्षे हे कालवे टिकले. परंतु पुढे मात्र सरकार कोट्यवधी रुपये देऊनही पाटबंधारे खात्याला या कालव्यांची दुरुस्ती व्यवस्थित करता न आल्यामुळे वारंवार हे कालवे फुटत असतात. याला निश्चितच पाटबंधारे खात्यातील गैरव्यवहार जबाबदार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केला आहे. धरणात पाणी असताना वेळेवर पिकांसाठी आवर्तन द्यायचे नाही, गरज नसताना कालवे सोडायचे, असा गलथान कारभार पाटबंधारे खात्याचा त्यात कालवा फुटीचे प्रकार घडतात याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

Back to top button