नगर : संगमनेरात शिक्षक दांपत्यास 45 लाखास गंडा | पुढारी

नगर : संगमनेरात शिक्षक दांपत्यास 45 लाखास गंडा

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  ‘कमी वेळेत दाम दुप्पट पैसे होतील,’ असे खोटे आश्वासन देऊन विविध कंपन्यांमध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडून संगमनेरच्या एका प्राध्यापकासह शिक्षिका पत्नीची तब्बल 45 लाख 23 हजार 512 रुपयांची फसवणूक झाली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी परिसरात राहत असणार्‍या खैरे कुटुंबियांच्या घरी आर. ओ. प्युरीफायर बसवण्याच्या संपर्कातून गणेश राधाकिसन वर्पे (रा. वरवंडी , ता. संगमनेर) याच्यासोबत ओळख झाली. त्यावेळी गणेश वर्पे याने मी बिग लाईफ केअर या आर ओ. कंपनीत झोनल मॅनेजर म्हणून काम करतो, असे सांगितले होते. गणेश व त्याची पत्नी मंगल वर्पे असे दोघांचे खैरे यांच्या घरी येणे- जाणे वाढले.

मी एफएमएलसी ग्लोबल मार्केटींग हरियाना, दास कॉईन, (नेट लिडर) संकल्प सिद्धी प्रोडक्ट प्रायव्हेट लिमीटेड नाशिक, आर. आर. वर्ल्ड फायनान्स कंपनी मुंबई अशा विविध मार्केटींग कंपन्यांमध्ये हिस्सेदार म्हणून काम करत असल्याचे गणेशने खैरे पती -पत्नीस सांगितले. तुम्हाला, पण या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून कमी काळात दुपटीने पैसे कमवून देतो, अशी हमी देऊन खैरे कुटुंबीयांचा विश्वास संपादन केला. गणेश वर्पे याने रेश्मा देसाई आणि त्याच्या मामाचा मुलगा महेश मांढरे यांच्याबरोबर खैरे पती- पत्नीची ओळख करून दिली.

‘तुम्हाला कमी वेळेत दुपटीने पैसे मिळतील,’ अशी हमी देसाई आणि मांढरे यांनी दिली . सौ. खैरे यांनी वर्पे याच्यावर विश्वास ठेवून 7 लाख50हजार रुपयांची गुंतवणूक एफ एमएलसी ग्लोबल लाईफकेअर कंपनी हरियाणा येथे केली. यानंतर यांना परतावा येऊ लागला. त्यामुळे खैरे यांचा ग्लोबल लाईफ केअर कंपनी, गणेश वर्पे, मंगल वर्पे, रेश्मा देसाई आणि महेश मांढरे यांच्यावर विश्वास वाढला.
‘दास क्वाईन क्रीप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवल्यास एका वर्षात दुप्पट पैसे करून देतो,’ असे गणेश वर्पे आणि त्याची पत्नी मंगल वर्पे यांनी सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेऊन खैरे यांनी (दि. 2 जानेवारी 2020) रोजी प्रमोद खैरे यांच्या बँकेच्या खात्यावरून गणेश वर्पे यांच्या बँक खात्यावर 5 लाख 50 हजार रुपये ट्रान्सफर केले.

यानंतर गणेश वर्पे याचे मालकीची आदीराज एंटरप्रायजेस या खात्यावर खैरे यांच्या एचडी एफसी बँक खात्यामधून2 लाख 30हजार त्यानंतर 10लाख रुपयांची रक्कम खैरे यांनी आदी राज एंटरप्रायजेस मालदाडरोड येथील ऑफीसमध्ये गणेश वर्पे, रेश्मा देसाई व महेश मांढरे यांना नेऊन दिली होती. यानंतर फसवणूक झाल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली.

Back to top button