वाळकीत अतिक्रमणासह पाणीप्रश्न पेटला | पुढारी

वाळकीत अतिक्रमणासह पाणीप्रश्न पेटला

वाळकी; पुढारी वृत्तसेवा : उन्हाळ्याची चाहुल लागण्यापूर्वीच नगर तालुक्यातील वाळकी गावातील पाणी प्रश्न पेटला आहे. सत्ताधार्‍यांनी मनमानी करत विरोधी सदस्यांच्या वार्डात जाणीव पूर्वक आणि राजकीय आकसापोटी पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण केल्याच्या आणि अतिक्रमण व गाळा बळकावण्याच्या निषेधार्थ सोमवारी (दि.27) विरोधी सदस्यांसह ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. यावेळी सत्ताधार्‍यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत ग्रामपंचायत कार्यालय दणाणून सोडण्यात आले.

वाळकी ग्रामपंचायतची निवडणूक दोन-अडीच महिन्यांपूर्वी झालेली आहे. या निवडणुकीत सत्तेवर आलेल्या सत्ताधार्‍यांनी निवडणुकीतील राजकीय वचपा काढण्यासाठी मनमानी सुरु केली आहे. जे विरोधी सदस्य निवडून आले आहेत. त्यांच्या वार्डात गेल्या वीस दिवसांपासून जाणीवपूर्वक पाणी पुरवठा विस्कळीत केला जात आहे. त्यामुळे आंबेराई वाडी भागात पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत.

एका विधवा महिलेच्या कुटुंबातील व्यक्ती विरोधी गटाच्या सदस्यांबरोबर राहतात म्हणून गेल्या 20 वर्षांपासून असलेला त्यांचा गाळा बळकावण्याचा प्रयत्न झाला. गावात अतिक्रमणाचा विळखा पडत असून अतिक्रमण धारकांना ग्रामपंचायत प्रशासन व सत्ताधारी पाठीशी घालत असल्याचा आरोप केला जात आहे.

गावच्या सरपंचाचा मनमानी कारभार सुरू असल्याने ग्रामसेवकांचे कोणतेही काम कर्मचारी ऐकत नाहीत, त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी हे सरपंचाच्या घरचे कामगार आहेत काय? असा संतप्त सवाल विरोधी सदस्यांनी केला आहे. या शिवाय गावात साफसफाई करणारे सफाई कामगार यांचे गेल्या 6 महिन्यांपासून पगार झालेले नाहीत. सरपंच व सत्ताधार्‍यांच्या सुरु असलेल्या या मनमानी विरोधात विरोधी सदस्यांनी आक्रमक होत ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

या ठिय्या आंदोलनात ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपाचे जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग, सागर कासार, ओंकार निमसे, बाळासाहेब गायकवाड, सचिन बोठे यांच्यासह ग्रामस्थ सुवर्णा भालसिंग, गणेश धोंडे, संतोष भालसिंग, गणेश भालसिंग, विकास कासार, आंबादास भालसिंग, विक्रम भालसिंग, रावसाहेब भालसिंग आदींनी सहभाग दर्शविला होता.

विरोधी सदस्यांवरच पाणी सोडण्याची वेळ !

पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी सरपंचाचे सोडून कोणत्याच सदस्यांचे काम ऐकत नाही. विरोधी सदस्यांच्या वार्डात पाणी सोडण्यासाठी कर्मचारी दुजाभाव करत आहेत. त्यामुळे विरोधी सदस्यांनाच रात्री अपरात्री पाणी सोडावे लागत आहे.कर्मकारी सरपंचाचे घरचे आहेत की ग्रामपंचायतीचे? असा सवाल ग्रामपंचायत सदस्य करत आहेत .

Back to top button