शेवगाव : प्रवरा मेडिकल ट्रस्टची याचिका ‘विड्रॉल’ | पुढारी

शेवगाव : प्रवरा मेडिकल ट्रस्टची याचिका ‘विड्रॉल’

शेवगाव शहर; पुढारी वृत्तसेवा : शेवगाव नगरपरिषदेविरुद्ध येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टने दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातून शेवटच्या क्षणी मागे घेण्यात आली. त्यामुळे शेवगाव नगरपरिषदेला 32 लाख रूपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. प्रवरा मेडिकल ट्रस्टचे एकनाथ आयुर्वेदिक कॉलेज व एकनाथ आयुर्वेदिक रुग्णालयाच्या जागेची मोजणी करून नगरपरिषदेने मालमत्ता करापोटी 32 लाख रूपयांची मागणी केली होती.

मात्र, प्रवरा मेडिकल ट्रस्टने मालमत्ता कर माफ असल्याचे शेवगाव नगरपरिषदेला कळविले. परंतु, कोणत्या कायद्याने ट्रस्टला मालमत्ता कर माफ आहे, याचा खुलासा केला नाही. त्यामुळे नगरपरिषदेने ट्रस्टला मालमत्ता जप्तीची नोटीस बजावली. त्याविरुद्ध ट्रस्टने जिल्हाधिकार्‍यांकडे अपिल केले. परंतु, अपिल मेंटनेबल नसल्याने जिल्हाधिकार्‍यांनी ते फेटाळले.

जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरूद्ध प्रवरा मेडिकल ट्रस्टने औरंगाबाद खंडपीठात धाव घेत स्थगिती आदेश मिळविला. त्यानंतर नगरपरिषदेतर्फे अ‍ॅड.नीळकंठ बटुळे यांनी न्यायालयात शपथपत्र दाखल केले. परंतु, ट्रस्टने वेळोवेळी मुदतवाढ घेऊन याचिका लांबविण्याचा प्रयत्न केला. याचिका न्यायमूर्ती मंगेश पाटील व न्यायमूर्ती एस.जी चपळगावकर यांच्या पीठासनाकडे सुनावणीसाठी आली. त्यावेळी ट्रस्टच्यावतीने पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी केली.

खंडपीठाने 14 फेब्रुवारी 2023 रोजी ठेवलेल्या सुनावणीस ट्रस्टने नकार दिला, तर स्थगिती रद्द करण्यात येईल, असा आदेश दिल्यानंतर ट्रस्टच्यावतीने युक्तिवाद करण्यात आला. नगरपरिषदेच्यावतीने अ‍ॅड नीळकंठ बटुळे यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर ट्रस्टला टॅक्स अपिलिएट कमिटीकडे अर्ज दाखल करण्याचे सुचवित याचिका फेटाळण्यात येईल, असे सांगितले. त्यावर ट्रस्टने पुन्हा याचिका सुनावणीसाठी ठेवत 32 लाख रुपये नगरपरिषदेला मिळण्यास विरोध केला. दुसर्‍या दिवशीच्या सुनावणीवेळी ट्रस्टने याचिका मागे घेतली. त्यामुळे शेवगाव नगरपरिषदेला 32 लाख रूपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. अ‍ॅड. बटुळे यांनी ही माहिती दिली.

Back to top button