नगर : शिवजयंती : पोलिसांचा मोठा बंदोबस्त ! | पुढारी

नगर : शिवजयंती : पोलिसांचा मोठा बंदोबस्त !

नगर : पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेप्रमाणे शिवजयंती आज रविवारी (दि.19) साजरी करण्यासाठी शिवप्रेमींनी जय्यत तयारी केली आहे. पोलिसांकडूनही सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून जिल्हाभरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नगर शहरातून शिवजयंतीची मिरवणूक निघणार असल्याने मिरवणूक मार्गावर पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. नगर शहरातून शिवजयंतीची मिरवणूक काढण्यासाठी सात मंडळांना कोतवाली पोलिसांनी परवानगी दिली आहे. दरम्यान, शिवजयंती साजरी करण्यासाठी शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शहरातील चौकाचौकांत भगवे झेंडे, पताकांचे तारण बांधण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नगर शहरासह उपनगरांत विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.

पोलिस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे 260 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. 71 जणांवर सीआरपीसी कलम 107, 110 नुसार कारवाई करण्यात आली आहे. 50 जणांना कलम 149 नुसार नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तर 30 जणांना दोन दिवसांसाठी तडीपार करण्यात आले आहे..

शहरात बॅनरबाजी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमिवर शिवप्रमींकडून शहरासह उपनगरांत मोठी बॅनरबाजी करण्यात आल्याचे पहायला मिळाले. शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे व सामाजिक संघटनांचे बॅनर्स शहरात मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहेत.

असा असाणार पोलिस बंदोबस्त
पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, स्वाती भोर, सहा पोलिस उपअधीक्षक, 30 पोलिस निरीक्षक, 85 सहायक पोलिस निरीक्षक, 1430 पोलिस कॉन्स्टेबल, 220 महिला पोलिस कॉन्स्टेबल, 600 होमगार्ड, एक एसआरपी तुकडी असा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Back to top button