नगर : ग्रामीण भागात ‘लालपरीने’ घेतली धाव | पुढारी

नगर : ग्रामीण भागात ‘लालपरीने’ घेतली धाव

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  राहुरी तालुक्यातील ‘ग्रामीण भागामध्ये अजूनही लालपरीची प्रतिक्षाच’ या सदराखाली दै. ‘पुढारी’ने वृत्त प्रकाशित करताच परिवहन विभागाने तत्काळ जागे होत दुरुस्त असलेल्या बसगाड्यांची उपलब्धता करून दिली. 15 ते 20 गावांमध्ये बंद झालेल्या बस गाडीच्या फेर्‍या पुन्हा सुरू केल्याने ग्रामीण भागातील ग्रामस्थांसह शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठा दिलासा लाभला आहे. नगर जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राहुरी बसस्थानकाची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. एकीकडे इमारत कोणत्याही क्षणी कोसळेल, अशा अवस्थेत असताना परिसरामध्ये खड्ड्यांमध्ये एसटी गाड्यांचे चाक रूतले जात आहे. अखेरीस राहुरी बसस्थानक येथील नियंत्रक स. पा. आयकर व सहाय्यक प्रदीप गलियल यांनी खड्ड्यांमध्ये माती आणून टाकली.

दरम्यान, मोडकळीस आलेली इमारत तर दुसरीकडे परिसरातील खड्डे व पसरलेल्या दुर्गंधीचा वास, अशा समस्येने ग्रासलेल्या बसस्थानकाला एसटी गाड्या कमी असल्याने विविध गावांमध्ये फेर्‍या रद्द कराव्या लागत होत्या. निम्म्यापेक्षा अधिक कमी गावांमध्ये लालपरी जातच नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींचे मोठे नुकसान होत होते. बस गाड्या बंद पडत असल्याने फेर्‍या रद्द करण्याची नामुष्की ओढावत होती. तर अनेक घाटमाथ्यावर एसटी बंद पडल्याने मध्ये रस्त्यातून प्रवाशांना पायी वाट धरावी लागत होती. यामुळे शासकीय अधिकारी, शेतमजूर, विद्यार्थ्यांचे सर्वाधिक नुकसान होत होते.

अखेरीस राहुरी बसस्थानकाचा वाढत चाललेल्या समस्यांची माहिती प्रसारित होताच परिवहन विभागाने तत्काळ दखल घेतली. बंद पडलेली मुक्कामी गाडी पूर्ववत केली. मांजरी मुक्कामी गाडी सुरू झाल्याने मांजरी, मानोरी, वळण, आरगगाव, तांदूळवाडी, रेल्वे स्टेशन येथील प्रवाशांसह विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. यासह सोनगाव, सात्रळ, गुहा, तांभेरे, राहुरी फॅक्टरी येथे बंद झालेली गाडी पुन्हा सुरू झाल्याने शेकडो विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. कोळेवाडी, म्हैसगाव, दरडगाव थडी, गडदे आखाडा, घोरपडवाडी, मल्हारवाडी या गावांमध्ये जाणारी बस गाडी दिवसाआड सुरू होती. ती गाडीही पूर्ववत सुरू झाली आहे.

राहुरी बसस्थानकाला 1 वर्ष जुन्या गाड्यांचा पुरवठा अधिक होता. परिणामी गाडीला ‘दे धक्का’ म्हणत लोटत प्रवास करावा लागत होता. अनेक ठिकाणी बस गाड्या बंद पडत असल्याने चालक, वाहकांसह राहुरी बसस्थानकातील अधिकार्‍यांची चांगलीच तारांबळ होत होती. दरम्यान, श्रीरामपूर, पाथर्डी, नेवासा आगारातून दुरूस्त असलेल्या बस गाड्या सोडल्या जात असल्याने राहुरीतून वेळेवर प्रवास होत आहे.

त्या निधीचे काय?
कोरोना कालखंडानंतर आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पाठपुराव्याने बसस्थानक इमारतीसाठी 17 कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान, संप काळामुळे मंजूर झालेला निधी संपकर्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी खर्च झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, परिवहन विभागाचे कामकाज पूर्ववत झाले आहे. आता तरी तो निधी मिळावा, अशी अपेक्षा राहुरीकरांना लागलेली आहे.

दै. ‘पुढारी’ चे आभार
राहुरी बसस्थानकाची समस्या मांडल्यानंतर बसगाड्यांचा प्रश्न बहुतांशपणे मार्गी लागला. सुमारे 25 गावांमध्ये लालपरीच्या फेर्‍या सुरू झाल्या आहेत. संबंधित ग्रामस्थ व विद्यार्थ्यांकडून दै. ‘पुढारी’ चे आभार व्यक्त केले आहे.

Back to top button