नगर : कर्ज मंजुरीच्या नावे अडीच लाखांना गंडविले | पुढारी

नगर : कर्ज मंजुरीच्या नावे अडीच लाखांना गंडविले

नगर : पुढारी वृत्तसेवा : कर्ज मिळवून देतो असे म्हणत नगरमधील एका व्यावसायिकाची दोन लाख 60 हजारांनी फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत मोहम्मद खालिद निजामुद्दीन सैफी (रा.कविजंगनगर, गुलमोहर रोड) यांनी तक्रार दिली असून, तोफखाना पोलिस ठाण्यात फसवणूक करणार्‍या पुण्यातील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  औदुंबर संभाराज मगर (रा. मोशी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. सैफी यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. त्यांना व्यवसायासाठी कर्जाची आवश्यकता असल्याने बँकांमध्ये कर्जासाठी चौकशी करीत होते. दरम्यान, सैफी यांचे मित्र राहुल भास्कर ठोकळ याच्यामार्फत औदुंबर संभाजीराव मगर याच्याशी ओळख झाली.

माझे नगर व पुणे येथे लोन व लायसन्स मंजुरीचे ऑफिस आहे, मी तुम्हाला लवकरात लवकर अक्सीस बँक खराडी बायपास (पुणे) शाखेतून लोन मंजूर करुन देतो, असे मगर याने सांगितले. तसेच त्यासाठी 3 लाख रुपये खर्च येईल, असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून सैफी यांनी पत्नीच्या बँकखात्यातून दोन लाख पाठविले व रोख 60 हजार दिले. तसेच कर्ज मंजुरीसाठी लागणारी सर्व कागदपत्रेही दिली. त्यानंतर वेळोवेळी कर्ज कधी मंजुर होईल याबाबत मगर याला विचारणा केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय आल्याने सैफी यांनी अक्सिस बँकेच्या खराडी बायपास शाखेत जावून चौकशी केली असता कोणतेही कर्जप्रकरण मंजुरीसाठी आले नसल्याचे समजले. तोफखाना पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button