राहुरी : मुंडन करत राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचा निषेध | पुढारी

राहुरी : मुंडन करत राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचा निषेध

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर कृषी अभियंता विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलन दहाव्या दिवशीही सुरूच आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्षांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत आंदोलकांनी मुंडण आंदोलन केले. राज्य शासनाकडून आंदोलकांच्या मागण्याबाबत दुर्लक्ष झाले असून जो पर्यंत न्याय मिळणार नाही, तो पर्यंत आंदोलन थांबणार नसल्यावर कृषी अभियंता आंदोलक ठाम आहे.

राहुरी (जि.अहमदनगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय कार्यालयासमोर सुमारे 700 कृषी अभियंता विद्यार्थी-विद्यार्थीनींनी 25 जानेवारी पासून ठिया मांडलेला आहे. कृषी महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परिक्षेच्या नविन अभ्यासक्रमामुळे कृषी अभियांत्रिकी पदवीधरांवर अन्याय होत आहे. अन्यायकारक धोरण तत्काळ थांबवत कृषी अभियंत्यांना न्याय देण्यासाठी 2021 व 2022 च्या परिक्षेला स्थगिती देण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी सुरू असलेले आंदोलन दिवसेंदिवस चिघळत आहे.

नवव्या दिवशी आंदोलकांनी प्रशासकीय इमारतीमध्ये अधिकारी, कर्मचार्‍यांना यांना कामकाज करण्यासाठी रोखले होते. विद्यापीठाचे कामकाज बंद पाडल्याने मोठा गाजावाजा होऊन प्रशासनाला समजूत काढण्यात यश आले होते. आंदोलनात सहभागी असलेले कृषी अभियंता विद्यार्थी व विद्यार्थीनींनी संतप्त होत राज्य शासन व लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष यांच्या भुमिकेबाबत नाराजी व्यक्त केली.

कृषी अभियंता पदवीधरांवर अन्याय करणारे निर्णय मागे घ्यावेत अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. जो पर्यंत मागण्या मान्य होणार नाही तो पर्यंत प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. पदवीधर निवडणूक काळामध्ये बहुतेक राजकीय नेत्यांनी आंदोलकांची भेट घेत मागण्यांबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. इतकेच नव्हे तर आंदोलकांनी राळेगणसिद्धी (ता.पारनेर) गाठत ज्येष्ट समाजसेवक आण्णा हजारे यांची भेटही घेतली. परंतु अजूनही राज्य शासनाकडून कोणताही प्रतिसाद लाभलेला नाही.

आज माजी आमदार तथा कृषी मुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी आंदोलकांची भेट घेतली. दोन ते तीन दिवसात योग्य निर्णय न झाल्यास आंदोलनासाठी कोठे बसायचे? कसे बसायचे? हे मी ठरविणार आहे. कृषी अभियंत्यावर अन्याय सहन होत नसल्याचे पटेल यांनी सांगितले.

राज्यपालांच्या पत्राकडेही दुर्लक्ष
कुलगुरू डॉ. पी.जी.पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्याचे कृषी अभियांत्रिकी संघटनेने सांगितले. कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांवर अन्याय नको अशा भूमिकेचे पत्र राज्यपालांनी पाठविले आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आंदोलकांची मागणी योग्य असल्याचे सांगितले. राज्यपाल यांच्या पत्राकडे राज्य लोकसेवा परिक्षा आयोगाचे अध्यक्ष यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

आणखी 40 जणांची प्रकृती बिघडली
आंदोलनादरम्यान स्वास्थ खालावलेल्यांकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष केल्याचा आरोप होताच आरोग्य विभागाने धाव घेत सर्व आजारी आंदोलकांची प्रकृतीची तपासणी केली. आजही 30 ते 40 जणांची प्रकृती बिघडली होती. आतापर्यंत शंभरपेक्षा अधिक आंदोलकांची प्रकृती खालावली आहे.

Back to top button