पुणतांबा गावास ‘वनश्री’पुरस्कार; विभागात सर्वाधिक वृक्ष लागवडीबद्दल गौरविण्यातआले | पुढारी

पुणतांबा गावास ‘वनश्री’पुरस्कार; विभागात सर्वाधिक वृक्ष लागवडीबद्दल गौरविण्यातआले

पुणतांबा; पुढारी वृत्तसेवा : नाशिक विभागात सर्वाधिक वृक्ष लागवड करुन योग्य संवर्धन केल्यामुळे पुणतांबा ग्रामपंचायतीला कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गेल्या चार वर्षांत रोजगार हमी योजनेंतर्गत राबविलेल्या या मोहिमेत सुमारे 80 हजार वृक्ष लागवड करुन ती जोपासली. यामधुन सुमारे 500 महिलांना रोजगार उपलब्ध झाला. विविध सामाजिक संस्थांनी या मोहिमेस सहकार्य केल्यामुळे वृक्ष लागवड यशस्वी होत आहे.

लोकसहभागासह शासकीय निधीतून जलसंधारणाच्या कामामुळे पुणतांबा व परिसर पाणीदार झाला आहे. कायम कोरडवाहू असलेला भाग बागायती होण्यास मोलाची मदत झाली आहे. कायम पाणी टंचाई असलेल्या भागात विहिरी, ओढे, नाले पावसाच्या पाण्यामुळे तुडुंब भरली आहेत. झालेल्या या उत्कृष्ट कामामुळे नाशिक विभागात प्रथम क्रमांकाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार देऊन ग्रामपंचायतीस ना. भुसे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी सरपंच डॉ. धनंजय धनवटे, ग्रामविकास अधिकारी प्रमोद कानडे, ग्राम रोजगार सेवक संतोष जोगदंड, पाणलोट सचिव विनोद धंनवटे, योगेश घाटकर, बाळासाहेब भोरकडे आदी उपस्थित होते.

  • 80 हजार वृक्षांची लागवड करुन केली जोपासना
  • सुमारे 500 महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे
  • विहिरी, ओढे, नाले पावसाच्या पाण्यामुळे तुडुंब भरली

हरित व स्वच्छ, सुंदर पुणतांबा करणार आहे. जलसंधारण व वृक्ष लागवडीतुन पुणतांबेसह परिसर पाणीदार व हरित होण्यास सुरुवात झाली आहे. यापुढेही ही मोहीम अधिक जोमाने राबवुन गाव स्वच्छ, सुंदर, हरित व आदर्श करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासाठी गट- तट विसरून सहकार्य करावे, असे आवाहन आहे.

                                                      – डॉ. धनंजय धनवटे, सरपंच पुणतांबा

Back to top button