नगर : जिल्हा लेबर फेडरेशनसाठी रस्सीखेच ! | पुढारी

नगर : जिल्हा लेबर फेडरेशनसाठी रस्सीखेच !

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील राजकीय नेत्यांची आर्थिक नाडी बनलेल्या जिल्हा मजूर फेडरेशनची निवडणूक चांगलीच रंगात आली आहे. 20 जागांसाठी 94 उमेदवारांनी तब्बल 132 अर्ज भरलेले आहेत. उद्या अर्ज माघारीची अंतिम मुदत असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यामध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांचीही जोरदार लॉबिंग सुरू असले, तरी श्रेष्ठींकडून कोणाकडे किती संस्था आहेत, हे पाहूनच उमेदवारी दिली जाणार असल्याचे सांगितले जाते.

एकेकाळी जिल्हा मजूर संस्थेतील काम वाटपातून खर्‍या अर्थाने ‘मजूर’ पुढे येताना दिसत होते. मात्र दिवसेंदिवस ही संस्था जणू राजकीय अड्डा बनत चालल्याचे बोलले जाते. या संस्थेची वार्षिक उलाढाल ही 70 कोटींपेक्षा अधिक आहे. संचालकांना मासिक भत्त्यांशिवाय आपल्या संस्थेच्या नावावर काम टाकून अन्य लाभही आहेच. त्यामुळे संचालक पदाला मोठे महत्व आहे. शिवाय राजकीय नेतेमंडळी, त्यांचे नातेवाईक आणि कार्यकर्ते निवडणुकीत उतरत असल्याने प्रतिष्ठाही दिसते.

कोरोनामुळे संस्थेची पंचवार्षिक निवडणूक तब्बल दोन वर्षे पुढे गेली होती. त्यानंतर आता उपनिबंधक गणेश पुरी यांच्या मार्गदर्शनात निवडणूक निर्णय अधिकारी रत्नाळे यांच्या देखरेखीत ही प्रक्रिया सुरू आहे. 94 इच्छुकांनी 132 अर्ज भरलेले आहेत. 31 जानेवारी अर्जमाघार, 1 फेब्रुवारीला चिन्ह वाटप, 12 फेब्रुवारीला मतदान आणि मतमोजणी होणार आहे. 668 मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत.

बोरूडे – गायकवाड संघर्ष

यंदाही विद्यमान अध्यक्ष अर्जून बोरूडे व पारंपरिक विरोधक प्रशांत गायकवाड यांच्या गटात ही निवडणूक होत आहे. सत्ताधारी बोरूडे गटाकडून इच्छुकांची संख्या जास्त असल्याने उमेदवारी देताना मोठी डोकेदुखी सुरू आहे. अर्थात अंतिम उमेदवारी देण्याचा त्यांना किती अधिकार आहे, याविषयी वेगवेगळ्या चर्चा आहेत. तर गायकवाड यांनीही मागील निवडणुकीचा अनुभव पाहता सक्षम उमेदवारांना संधी देत धक्कादायक निकालासाठी व्यूहरचना आखली. यासाठी ‘बारामती’ची ‘रसद’ मिळण्याची शक्यता आहे.

घोडेबाजार आणि पळवापळवी
जिल्ह्यात 20 जागांसाठी 668 मतदार (संस्था) असणार आहे. यामुळे मतदारांची पळवापळवी आणि त्यासाठी घोडेबाजारही होण्याची शक्यता आहे. ऐरवी संस्थेतून काम वाटपात जरी अन्याय झाला असला, तरी या निवडणुकीतून मतदानाचे ‘दाम’ पोहचविण्याचा प्रयत्न असणार आहे.

तालुका अर्ज मतदार
नगर शहर 5 78
नगर तालुका 8 69
पारनेर 7 43
श्रीगोंदा 7 55
कर्जत 4 47
जामखेड 15 35
पाथर्डी 4 32
नेवासा 4 47
शेवगाव 5 20
राहुरी 9 55
श्रीरामपूर 3 40
राहाता 3 42
कोपरगाव 7 54
संगमनेर 7 39
अकोले 4 12
जाती-जमाती 7 668
इमाव 13 668
महिला 13 668
वि.ज.भ.ज 8 668

Back to top button