नगर : राहुरी विद्यापीठ विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच ; 70 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली | पुढारी

नगर : राहुरी विद्यापीठ विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच ; 70 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या भूमिकेत बदल व्हावा म्हणून राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कृषी अभियंत्यांचे आंदोलन तब्बल पाचव्या दिवशीही सुरूच होते. माजी नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आंदोलकांची स्वतंत्र भेट घेऊन, त्यांच्या मागण्या समजून घेतल्या . या मागण्यांचा शासन दरबारी पाठपुरावा करू, असे आश्वासन त्यांनी दिले. आदर्श गाव समितीचे पोपटराव पवार व राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी आंदोलकांची भेट घेतली.

पोपटराव पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, आज (रविवारी) सत्यजित तांबे व सिनेट सदस्य संजीव भोर यांनी स्वतंत्र भेटी देत विद्यार्थ्यांशी चर्चा केली. कृषी सेवा मुख्य परीक्षा 2021 व 22 तत्काळ स्थगिती देऊन अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणे करावा. स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचलनालय स्थापन करावे.मृदा व जलसंधारण विभागामध्ये कृषी अभियांत्रिकी शाखेच्या उमेदवारांची भरती करावी, महाराष्ट्र राज्य सेवा 2023 मुख्य परीक्षेत कृषी अभियांत्रिकी शाखेसाठी वैकल्पिक विषयाचा समावेश करावा, या आंदोलकांच्या मागण्या आहेत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षा अभ्यासक्रमात बदल करताना किमान दोन वर्षे तरी आधी जाहीर केले पाहिजे, मात्र तसे झाले नाही.

कृषी अभियंत्यांना प्रमाणापेक्षा अधिक फायदा मिळाला, हा राज्य लोकसेवा आयोगाचा दावा वास्तवतेशी निगडित नाही. आतापर्यंत केवळ अडीच टक्के कृषी अभियंत्यांची कृषी खात्यात निवड झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भूमिकेमुळे कृषी अभियंत्यांत नैराश्याची भावना वाढली आहे. काही महिन्यांपूर्वी कृषी अभियंत्यांनी या मागणीसाठी आंदोलन केले, मात्र त्याची दखल न घेतल्याने राज्यस्तरीय आंदोलन सुरू आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. म. फुले कृषी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कृषी अभियांत्रिकीचे प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

तब्बल 70 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली
आंदोलन सुरू असताना एका आंदोलक विद्यार्थिनीची आजही चौथ्या दिवशी तब्येत अचानक बिघडली. तिला तातडीने उपचारार्थ हलविले. तिची तब्येत बरी आहे. आंदोलनात विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. 700 आंदोलकांपैकी आतापर्यंत तब्बल 70 जणांची प्रकृती खालावली आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नसल्याचे मत उप अभियंत्यांनी व्यक्त केले आहे.

Back to top button