नगर : घरकुल उद्दिष्टपूर्तीत कर्जत-जामखेड अव्वल | पुढारी

नगर : घरकुल उद्दिष्टपूर्तीत कर्जत-जामखेड अव्वल

कर्जत : पुढारी वृत्तसेवा :  घरकुल योजनेची उद्दिष्टपूर्ती करून कर्जत-जामखेड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांच्या समन्वयातून हे उल्लेखनीय काम झाले आहे. महाआवास योजनेत कर्जत व जामखेड तालुक्यांत वाखाणण्याजोगे काम झाले आहे. त्यात जामखेड तालुक्यात 56 दिवसांत 710 घरकुलाचे काम पूर्ण झाले असून, जामखेड तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. कर्जत तालुक्यात 56 दिवसात 585 घरकुलांचे काम पूर्ण झालेे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात योग्य समन्वय असेल तर उल्लेखनीय कामगिरी होते. याचं उत्तम उदाहरण कर्जत-जामखेड मतदारसंघात पाहायला मिळत आहे.

कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार नागरिकांशी वेळोवेळी संवाद साधून, सरकारी योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कायमच प्रयत्नशील असतात. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून कर्जत व जामखेडमध्ये बैठका घेऊन त्यांनी वेळोवेळी प्रश्न मार्गी लावले. तसेच नागरिक आणि अधिकार्‍यांच्या वारंवार संपर्कात राहून व सरकारी पातळीवर केंद्र सरकारकडेही याबाबत पाठपुरावा केला होता.

2021-2022 या वर्षात पंतप्रधान आवास योजनेतून जामखेडमध्ये 2225 घरकुलाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी 2222 घरकुले मंजूर झाली. त्यापैकी 1040 घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. तसेच कर्जत तालुक्यात 2180 घरकुलांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी 2168 घरकुले मंजूर होऊन 821 घरकुलांचे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. तसेच रमाई आवास योजनेच्या माध्यमातून दोन्ही तालुक्यात एकूण मंजूर 901 घरकुलांपैकी तब्बल 202 घरकुलांचे काम पूर्ण झाले. मागच्या वर्षी घरकूल योजनेत जामखेडचा नाशिक विभागीय स्तरावर दुसरा क्रमांकआला होता. यंदा जामखेड नगरपरिषदेने घरकुल योजनेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.

 

Back to top button