संगमनेर : ‘त्या’ झोपडपट्टीधारकांना मिळणार सातबारा | पुढारी

संगमनेर : ‘त्या’ झोपडपट्टीधारकांना मिळणार सातबारा

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : नगरपालिका हद्दीतील सर्वच नोंदणीकृत झोपडपट्टी धारकांना हक्काचा सातबारा उतारा व मालमत्ता असेसमेंट उतारा (8- अ) मिळणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख अमर कतारी यांनी नोंदणीकृत झोपड पट्टीधारकांना सातबारा व असेसमेंट उतारा मिळावा तसेच घरपट्टी आणि करपट्टी लागू करावी, अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीला तसेच प्रयत्नांना अखेर यश आले आहे. त्यामुळे लवकरच नोंदणीकृत झोपडपट्टी धारकांना आपल्या हक्काचा सातबारा मिळणार आहेत. त्यामुळे नोंदणीकृत झोपडपट्टी धारकांमधून समाधान व्यक्त येत आहे.

शासकीय योजना व कोणत्याही प्रकारचे कर्ज असो यासाठी नगरपालिकेचा सातबारा, मालमत्ता असेसमेंट उतारा याची गरज असते. याबाबत संजय गांधी नगरपरिसरातील नागरिकांच्यावतीने संगमनेर नगरपालिकेला गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करण्यात येत होती. या संदर्भात अमर कतारी यांच्यासह संजय गांधीनगर परिसरातील नागरिकांनी माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्याकडेही वेळोवेळी पाठपुरावा केला होता.

याचा लाभ संजय गांधीनगर वडार वस्ती व नगरपालिका हद्दीतील सर्वच नोंदणीकृत झोपडपट्टी धारकांना होणार आहे. संगमनेर नगरपालिका व संजय गांधीनगर परिसरातील आहे त्या ठिकाणी घरकुले बांधण्यात येतील, असा नागरिकांचा संगमनेर न्यायालयासमोर तडजोड नामा करारनामा झालेला असताना सुद्धा अद्याप घरकूल योजनेचे काम सुरू झालेले नाही. घरकूल योजनेचे काम करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी वेळो-वेळी मोर्चे, आंदोलन व निवेदनेेेही दिलेली होती.

असेसमेंट उतारा देण्याचे मान्य
नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी मागण्यांबाबत सविस्तर अभ्यास करून सन 2023-24 या आर्थिक वर्षात नगरपालिकेच्या हद्दीमधील सर्वच नोंदणीकृत झोपडपट्टी धारकांना, घर, लाभार्थ्यांना मालमत्ता करार, असेसमेंट उतारा देण्याचे मान्य केल्याबाबत लेखी पत्र दिले असल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Back to top button