नगर : वाळकी येथील श्रीराम मंदिरात चोरी | पुढारी

नगर : वाळकी येथील श्रीराम मंदिरात चोरी

वाळकी : पुढारी वृत्तसेवा :  नगर तालुक्यातील वाळकी येथील श्रीराम मंदिरातून चोरट्यांनी चांदीच्या दोन पादुका व मंदिरातील दानपेटी लांबविली. ही घटना शनिवारी (दि.7) पहाटे घडली. वाळकी येथील श्रीराम मंदिराशेजारी चोहोबाजूंनी लोकवस्ती असून, येथे भाविकांची मोठी वर्दळ असते. याच मंदिरात चोरीची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. मंदिरातील श्रीराम व अन्य देवतांची पूजाअर्चा करण्यासाठी सकाळी सात वाजता सचिन बाबासाहेब भालसिंग गेले.

त्यावेळी त्यांना मंदिराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. आतमध्ये गाभार्‍यात जाऊन पाहिले असता, साधारण दोन किलो वजनाच्या चांदीच्या दोन पादुका आणि दानपेटी गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी भाजपचे संघटन सरचिटणीस दिलीप भालसिंग यांना घटनेबाबत सांगितले. भालसिंग यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.  पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. भालसिंग यांच्यासह नागरिकांनी परिसरात दानपेटी शोधत असताना ती विठ्ठल मंदिराजवळ फोडलेल्या अवस्थेत सापडली. दानपेटीत साधारणपणे 20 ते 25 हजारांपर्यंत रक्कम असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

Back to top button