नगर : सेतू ‘लुटी’चा आमदारांकडून पर्दाफाश | पुढारी

नगर : सेतू ‘लुटी’चा आमदारांकडून पर्दाफाश

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : सेतू केंद्राबाहेर आकरण्यात येणार्‍या दराची माहिती न देता सर्रास लुटमार करणार्‍या सेतू केंद्राचा आ. प्राजक्त तनपुरे यांनी पर्दाफाश केला. केंद्रचालकाची झाडाझडती घेत दलालासह सेतू केंद्र चालकांवर गुन्हा दाखल करण्याच मागणी आ. तनपुरे यांनी केली.  आ. तनपुरे राहुरी येथील महसूल प्रांगणामध्ये असलेल्या सेतू कार्यालयामध्ये पोहचले तेव्हा तेथील फलक व सेवा शुल्क दर्शविणारी माहिती नसल्याचे समोर आले. त्यामुले संतापलेले आमदार तनपुरे यांनी थेट तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्याशी संपर्क साधत कारवाईची मागणी केली.

या सेतू कार्यालयामध्ये दलालांमार्फत शासकीय दाखले मिळविण्यासाठी जास्तीच्या पैशाची मागणी तसेच महसूल प्रशासनाकडून विविध कामे करून घेत असताना अडचणी येत असल्याच्या समस्या आ. तनपुरे यांच्याकडे काही नागरीकांनी मांडल्या होत्या. त्या तक्रारीची दखल घेत आ. तनपुरे अचानकपणे सेतू कार्यालयात धाव घेत कामकाजाची पाहणी केली. त्यांनी उपस्थितीत नागरीकांकडे दाखले मिळण्याचा कालावधी व आकारले जाणारे शुल्क याबाबत विचारणा केली. संबंधित सेतू कार्यालयाल सेवा शुल्क तसेच परवाना पत्र नसल्याने संतापत आ. तनपुरे यांनी थेट तहसीलदार शेख यांच्याशी संवाद साधला. खाजगी सेतू चालकांना परवानगी देत असताना नियमावली, दरपत्रक व दाखले देण्याचा कालावधी का नाही? याबाबत तत्काळ कारवाई व्हावी. नागरीकांच्या समस्या तत्काळ सोडविण्यात याव्यात अशा सूचना आ.तनपुरे यांनी दिला.

दलालांमार्फत कामे नको

आ. तनपुरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करताना सेतू कर्मचार्‍यांनी कागदोपत्रांची पडताळणी सुरू केल्याने एकच खळबळ उडाली होती. सेतू चालकांनी नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, दलालांमार्फत कोणतेही कामकाज न करता सर्वसामान्यांशी थेट संवाद साधावा. अनाधिकृतपणे पैसे उकळणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश आ. तनपुरे यांनी दिले.

 

तहसीलदार शेख यांनी दलालांना वेसण घालत नागरीकांची लूट करणार्‍यांचा बंदोबस्त करावा. गैरकृत्य करणार्‍या सेतू चालकांची चौकशी व्हावी. जनतेची लूटमार होत असेल तर तहसीलदार शेख यांनी गुन्हे दाखल करावेत-
– प्राजक्त तनपुरे, आमदार
.

सीएससी केंद्रामध्ये कोणतेही फलक, दाखल्यांची माहिती व दरपत्रक नसल्याचे आमदार तनपुरे यांनी सांगितले आहे. त्यानुसार नायब तहसीलदारांमार्फत संबंधित सीएससी केंद्राची चौकशी केली जाईल. कागदोपत्री हेराफेरी आढळल्यास सीएससी परवाना रद्द केला जाईल.
– फसियोद्दीन शेख, तहसीलदार, राहुरी

Back to top button