राहुरी : बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव कुत्रा ठार | पुढारी

राहुरी : बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव कुत्रा ठार

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील नालकर वस्ती परिसरात बिबट्याच्या दहशतीने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. रविवारी मध्यरात्री बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्यास ठार केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चिंचविहिरे ग्रामपंचायत हद्दीतील सुर्यानगर, गिते-नालकर व झांबरे वस्ती परिसरात बिबट्याचे सातत्याने दर्शन होत आहे. या बिबट्याने शेळ्या, कुत्रे व अन्य जनावरांवर हल्ला करून त्यांना फस्त केले आहे.

रविवारच्या मध्यरात्री भूषण दिलीप नालकर यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यानंतर पाळीव कुत्र्यास नितीन शिंदे यांच्या गिन्नी गवताच्या शेतात नेऊन फस्त केले. सातत्याने पाळीव प्राण्यांवर बिबट्या हल्ला करीत असल्याने परिसरातील शेतकरी व नागरिक घबराट पसरली आहे. या भागात वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी नालकर, झांबरे व गीते वस्ती परीसरातून होत आहे.

Back to top button