नगर : उपनगरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट | पुढारी

नगर : उपनगरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट

सावेडी : पुढारी वृत्तसेवा : सराफ बाजारात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून, परिसरात येणारे नागरिक, ग्राहक व व्यवसायिकांना या त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. या जनावरांमुळे परिसरात पडणार्‍या शेणामुळे दुर्गंधी पसरली असून, आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे महापालिकेने या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यावसायिकांमधून होत आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सराफ बाजारात जिल्ह्यासह शहरातून ग्राहक खरेदीसाठी येतात. मात्र, परिसरात मोकाट जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा होत आहे.

बाजारपेठेत येणार्‍या नागरिकांसह ग्राहक, व्यावसायिकांना या जनावरांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परिसरात मोकाट जनावरांचे कळप फिरत असून, दुकानासमोरच मोठ्या प्रमाणात शेणाचा सडा पडत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, या शेणावरून पाय घसरून पडल्याने एका नागरिकास गंभीर दुखापत झाली आहे. या मोकाट जनावराचा महापालिकेने बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यवसायिकांकडून होत आहे. सराफ बाजारात असणार्‍या भाजी मार्केटमध्ये काही नागरिक दिवसभर आपली जनावरे सोडून जातात. मात्र, ही जनावरे सराफ बाजारात फिरत असल्याने सर्व व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

मोकट जनावरांचे शेण दुकानासमोरच पडत असल्याने, दुर्गंधी पसरते.अनेकदा ग्राहक पाय पडून घसरून पडल्याने अपघात होत आहे. त्यामुळे या जनावरांचा बंदोबस्त करावा.

Back to top button