नगर : भूमिहीन 297 कुटुंब झाले बागायतदार ! | पुढारी

नगर : भूमिहीन 297 कुटुंब झाले बागायतदार !

नगर : पुढारी वृत्तसेवा :  अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील भूमिहिन तरूणांसमोर स्वत:सह कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा असतानाच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेचा आधार मिळाला आहे. कायमस्वरुपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने जिल्ह्यात 297 कुटुंबांना 720 एकर जमीनी विनामुल्य देत बागायतदार बनविले आहे .भविष्यात आणखी 550 लाभार्थ्यांना जमिन वाटप करण्यात येणार असून, त्यासाठी शासनाने जमिनी खरेदीचीही तयारी दर्शविली आहे.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना जिल्हयातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील दारिद्रय रेषेखालील भूमिहिन शेतमजुर कुटूंबास कायमस्वरुपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे याकरीता महत्वकांक्षी ठरत आहे.

या योजनेच्या माध्यमातून चार एकर जिरायती किंवा दोन एकर बागायत जमिन अनुदानावर उपलब्ध करून देण्याची योजना सहायक आयुक्त देवढे यांच्या मार्गदर्शनात राबविली जात आहे. 2004 पासून आजपर्यंत 720 एकर जमिनीची खरेदी करत 297 लाभार्थ्यांना वाटण्यात आलेली आहे.  नव्याने 550 प्रस्ताव प्राप्त झाले आहे. या लाभार्थ्यांनाही जमिनी वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी जमिनी खरेदीची शासनाची तयारी आहे. ज्या शेतकर्‍यांना शासनाचे दर मान्य असतील अशा शेतकर्‍यांची जमीन शासन विकत घेऊन ती जमीन अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील दारिद्रय रेषेखालील भूमिहिन शेतमजूर असनार्‍या पात्र लाभार्थी कुटूंबास शासन नियमानुसार 100 टक्के अनुदानावर वाटप करणार आहे.

 

समाजकल्याणमधून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. जिरायत जमीन प्रति एकर 5 लाख आणि बागायत जमीन 8 लाखात खरेदी करण्याचे निर्देश शासनाकडून मिळालेले आहेत. जमिनी विकू इच्छिणार्‍यांनी नगरच्या समाजकल्याण विभागाशी संपर्क करावा.
                                     – राधाकिसन देवढे,  सहाय्यक आयुक्त समाजकल्याण

Back to top button