नगर शहरात चार घरांवर सशस्त्र दरोडा; सव्वा चार लाखांचा ऐवज लुटला | पुढारी

नगर शहरात चार घरांवर सशस्त्र दरोडा; सव्वा चार लाखांचा ऐवज लुटला

नगर; पुढारी वृत्तसेवा : चोरटे काही दिवसांपासून वाहन चोर्‍या, घरफोड्या, महिलांचे दागिने पळवून नगरकरांचे दिवाळे काढले आहे. जिल्ह्यातील क्राईम ग्राफ वाढत असतानाच सोमवारी (दि.26) पहाटेच्या सुमारास कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार घरांवर सशस्त्र दरोडा टाकून दरोडेखोरांनी सव्वा चार लाखांचा ऐवज लंपास केला. एकाच दिवशी चार घरांवर दरोडा टाकल्याने गुन्हेगारांनी पुन्हा एसपींना सलामी तर दिलीच, शिवाय कायदा व सुव्यवस्थेवर पोलिसांचे नियंत्रण नसल्याचे दाखवून दिले.

कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गाडळकर मळा, आगरकर मळा आणि विद्या कॉलनीतील चार घरे लक्ष करत दरोडेखोरांनी चाकूच्या धाकावर रोख व सोन्या-चांदीचे दागिने असा चार लाख 30 हजार 500 रूपयांचा ऐवज चोरून नेला. चार घरांवर पडलेल्या दरोड्याबाबत यश उमेश शेळके (रा. विद्या कॉलनी, नगर-कल्याण रोड, अहमदनगर) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

सहा दरोडेखोरांनी (दि.26) पहाटे 1 ते 3 वाजण्याच्या दरम्यान घरांच्या दरवाजांचे कडीकोयंडे कटरने तोडून दरोडेखोरांनी आत प्रवेश करत हा डाव साधला. दोघांनी घराबाहेर टेहळणी करून इतर चौघांनी शस्त्रांच्या धाकावर ऐवज लुटून नेला आहे. चारही घटनेमधील चोरटे एकच असल्याचे गाडळकर मळ्यातील एका घराच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते. गत काही दिवसांपासून कोतवाली व तोफखाना पोलिस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात बोकाळली आहे. गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिस अपयशी ठरत असल्याने गुन्हेगार शिरजोर झाले आहेत.

दोन तासांत चार घरे लक्ष्य
दरोडेखोरांनी मध्यरात्री 1 ते 3 वाजेपर्यंत चार घरांवर दरोडा टाकला. त्यात यश शेळके (रा. विद्या कॉलनी) यांच्या घरातून दागिने व रोख असा 52 हजारांचा ऐवज चोरून नेला. आकाश सुभाष सुर्यवंशी (रा. गाडळकर मळा) यांच्या घरातून एक लाख 95 हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. वसंत रभाजी चांदणे (रा. रंगनाथ रेसिडेन्सी, आगरकर मळा) यांच्या घरातून रोख, दागिने व बँकांचे एटीएम असा 65 हजार 500 रूपयांचा ऐवज चोरून नेला. तर राजू गंगाधर पडोळे (रा. रंगनाथ रेसिडेन्सी, आगरकर मळा) यांच्या घरातून दागिने व मोबाईल असा एक लाख 18 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.

एसपींची घटनास्थळी भेट
पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली व तपासासाठी सूचना केल्या. त्यांच्या समवेत अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधीक्षक अनिल कातकाडे, एलसीबीचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, कोतवालीचे निरीक्षक संपत शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक रविंद्र पिंगळे, उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, मनोज कचरे, सुखदेव दुर्गे, मनोज महाजन आदी पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी पाहणी केली.

तपासासाठी दोन पथके
दरोड्याच्या चार घटनांचा समांतर तपास एलसीबी आणि कोतवाली पोलिसांच्या दोन पथकांकडून केला जात आहे. तपासासाठी सीसीटीव्ही फुटेजचा आधार पोलिसांनी घेतला असून फिंगर प्रिंटच्या रिपोर्टनंतर चोरट्यांची ओळख पटण्यात मदत होऊ शकते.

फॉरेन्सिक पथकाला पाचारण
कोतवाली पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाल्यानंतर डॉग स्कॉट व फॉरेन्सीक पथकाला पाचारण केले होते. मात्र, डॉग हा सीकमध्ये असल्याने पोलिसांना डॉग स्कॉटची मदत मिळाली नाही. घटनास्थळावरून फिंगर प्रिंट घेण्यात आले असून त्याआधारे दरोडेखोर रेकॉर्डवरील आहेत किंवा नाही, याचा तपास पोलिस करीत आहेत.

प्री-प्लॅनिंग करून टाकले दरोडे
घराच्या दरवाज्याचे कडीकोयंडे तोडण्यासाठी दरोडेखोरांनी कटावणीचा (कटर) वापर केला. तसेच सहाही दरोडेखोरांनी ओळख पटू नये यासाठी टोप्या घातलेल्या होत्या. धारदार चाकू, रॉड अशी शस्त्रे त्यांच्याकडे होती. घरातील महिलांच्या व लहान मुलांच्या अंगावरील दागिने तोडण्यासाठी दरोडेखोरांकडे सोनाराकडे असतात तशा प्रकारचे कटर होते. तसेच ऐवज चोरल्यानंतर घरातील सदस्यांचे मोबाईल घेऊन ते नंतर रस्त्यात दरोडेखोरांनी फेकून दिले. त्यामुळे दरोडेखोर हे सराईत असल्याचे बोलले जात आहे.

Back to top button