नगर : कोरोना वेशीवर; प्रशासन मिशन मोडवर! जिल्हाभरात राखीव बेडची व्यवस्था | पुढारी

नगर : कोरोना वेशीवर; प्रशासन मिशन मोडवर! जिल्हाभरात राखीव बेडची व्यवस्था

गोरक्षनाथ शेजूळ

नगर : जिल्ह्यावर पुन्हा एकदा कोरोनाचे ढग घोंगावत असताना, दुर्दैवाने तिसरी लाट आलीच, तर त्यासाठी आरोग्य प्रशासनाने आवश्यक ती सर्व पूर्वतयारी केली आहे. दोन दिवसांत या संदर्भात प्रशासनाकडून मॉकड्रिल घेण्याचीही तयारी सुरू आहे. जिल्ह्यात कोरोनाचे सध्या चार रुग्ण सक्रिय आहेत. दररोज चाचण्याही केल्या जात आहेत. मात्र बाधितांची संख्या नगण्य आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी आवश्यक त्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

डॉ. घोगरे यांनी जिल्हा रुग्णालयात नवीन आयसीयू तसेच अन्य विभागातही कोरोना बेड तयार ठेवले आहेत. या संदर्भात दोन उपजिल्हा रुग्णालय तसेच 17 ग्रामीण आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना अलर्ट केले आहे. डॉ. सांगळे यांनीही प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांना लसीकरणासह अन्य महत्वपूर्ण सूचना केलेल्या आहेत.

केवळ 6.76 टक्के लोकांनी घेतला बुस्टर डोस
जिल्ह्यात दोन डोस नंतर बुस्टर डोस घेण्याचे आरोग्य प्रशासनाने आव्हान केले होते. मात्र, कालअखेरपर्यंत 36 लाख लोकांपैकी केवळ 2 लाख 49 हजार 675 नागरिकांनी बुस्टर डोस घेतला असून, उवर्रीत 33 लाख 59 हजार नागरिकांनी बुस्टरकडे पाठ फिरवल्याचे दिसते. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव काळात नागरिकांना बुस्टर डोस विनामुल्य दिला जात होता.

बंद 17 ऑक्सिजन प्लॅन्ट सुरू होणार!
तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शासनाने ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी ऑक्सिजन प्लॅन्ट उभे केले होते. मात्र, त्याचे वीजबील थकल्याने महावितरणने त्याचा वीज पुरवठा खंडीत केलेला होता. त्यामुळे सहा महिन्यांपासून हे प्रकल्प केवळ शोभेच्या वास्तू म्हणूनच उभ्या होत्या. आता कोरोनाच्या सावटामुळे प्रशासनाचे पुन्हा एकदा या ऑक्सीजन प्लॅन्टकडे लक्ष गेले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सुचनेनुसार तातडीने वीजबिलापोटी 30 लाखांची तरतूद करण्यात आल्याचे समजते. लवकरच हे प्लॅन्ट सुरु होणार असल्याचे प्रशासन सांगत आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासनाने पूर्वतयारी केली आहे. आपल्याकडे रुग्णसंख्या चिंताजनक नाही. मात्र तरीही नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. ज्यांचे राहिलेले आहे त्यांनी लसीकरण करून घ्यावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा.

                                     – डॉ. विक्रमजित पडोळे , जिल्हा रुग्णालय, नगर

जिल्ह्यात 3168 बेड राखीव – 293 ः व्हेंटीलेटर बेड, 274 ः नॉन व्हेंटीलेटर बेड, 2601 ः ऑक्सीजन बेड. कोठे व किती राखीव बेड – बूथ हॉस्पिटल ः 150 बेड, शिर्डी संस्थान ः 250 बेड, साईनाथ हॉस्पिटल ः 300 बेड, विखे पाटील हॉस्पिटल ः 400 बेड, सिव्हीलसह अन्य ः 2068 बेड, महापालिका क्षेत्रात स्वतंत्र बेड राखीव. ऑक्सीजन प्रकल्पही सज्ज – परमिनीट 10850 लि. एकूण क्षमता, परमिनीट 1600 लिटर प्रकल्प, 2238 मोठे ऑक्सीजन सिलेंडर, 667 छोटे ऑक्सीजन सिलेंडर, 212 केएलचे लिक्विड प्रकल्प, 2940 लिटरचा डयूरा ऑक्सी सिलेंडर. पुरेसा औषधसाठाही उपलब्ध – 23, 297 ः रेमेडीसीवीर, 1,20,000 ः पीपीई किट, 2,40,000 ः एन.95 मास्क, पॅरासिटेमोल ई. गोळ्याही उपलब्ध.

Back to top button