नगर : शहरात ख्रिस्त जन्मोत्सवाचा उत्साह | पुढारी

नगर : शहरात ख्रिस्त जन्मोत्सवाचा उत्साह

नगर : पुढारी वृत्तसेवा : आज अनेक बलाढ्य राष्ट्रामध्ये अशांतता आहे. जग अण्वस्त्राच्या सावटाखाली जगत आहे. अशा परिस्थितीत फक्त आध्यात्मच या संकटापासून मानवाला वाचवू शकते, असे प्रतिपादन पुण्याचे रेव्ह.भालचंद्र कांबळे यांनी केले. येथील ऐतिहासिक ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये नाताळ सण व ख्रिस्त जन्मोत्सवानिमित्त रविवारी (दि.25) मोठ्या भक्तीचे आयोजन करण्यात आले होते. रेव्ह. विद्यासागर भोसले यांच्या भक्ती प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी संदेश देताना रेव्ह. कांबळे म्हणाले, येशू ख्रिस्ताचा जन्म न्यायासाठी झालेला नसून, मानवाच्या तारणासाठी झालेला आहे. देवाने मानवाला पापापासून मुक्ती मिळावी व स्वर्गीय राज्य प्राप्त व्हावे, यासाठी येशू ख्रिस्ताला या जगात पाठविले आहे.

चर्चच्या मुख्य धर्मगुरूंनी सर्वांचे आभार मानले. सेक्रेटरी जॉन्सन शेक्सपियर यांनी सभासदांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी उपस्थित असलेले आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार करण्यात आला. आमदार जगताप यांनी ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा दिल्या. सदरची भक्ती यशस्वी करण्यासाठी कमिटीचे सदस्य एन. बी. जाधव, महेंद्र भोसले, संतोष जाधव, राजेश चाबुकस्वार, वसंत कांबळे, मिलिंद भिंगारदिवे, फ्रँक्लिन शेक्सपियर, ऑलिवन शेक्सपियर, शामराव भिंगारदिवे, सचिन जाधव, संदीप पारधे, सॅम्युएल तिजोरे, विजय अंधारे यांनी परिश्रम घेतले.

कोरोनाबाबत नियमांचे पालन करा

कोरोना विषाणूने पुन्हा एकदा जगामध्ये भितीचे वातावरण निर्माण केलेले आहे. या विषाणूच्या प्रादुर्भावापासून मानवाचे रक्षण होण्यासाठी आपण नियमांचे पालन करून प्रभू येशूकडे प्रार्थना करावी, असा बोधपर संदेश रेव्ह. कांबळे यांनी दिला.

प्रभू येशूचा संदेश प्रेरणादायी : आ.जगताप

प्रार्थनास्थळे ही मानवी जीवनात आध्यात्म, शांतता व जगण्याचा उत्साह वाढविणारे प्रेरणास्रोत आहेत.या माध्यमातून सत्कर्म करण्याची भावना जागृत होते. प्रभू येशूचा शांततेचा संदेश संपूर्ण विश्वासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

Back to top button